गुंतवणुकीच्या आमिषाने ३०० कोटींची फसवणूक

गुंतवणुकीच्या आमिषाने ३०० कोटींची फसवणूक

पुणे, ता. १८ : चांगला परतावा देण्याच्या आमिषाने गुंतवणुकीच्या नावाखाली गुंतवणूकदारांची ३०० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट या खासगी वित्तीय संस्थेच्या सेल्वकुमार नडार (रा. कोंढवा खुर्द) याच्यासह साथीदारांविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन पवार (रा. वाघोली) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम तीन नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नडार आणि साथीदारांनी अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट नावाने खासगी वित्तीय संस्थेचे कार्यालय लष्कर भागातील न्यूक्लिअस मॉल परिसरात सुरू केले होते. नडार आणि साथीदारांनी गुंतवणुकीवर परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. काही जणांना त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत कर्ज मंजुरी प्रक्रियेसाठी नडार याने पैसे उकळले होते. तक्रारदार पवार यांचा विश्वास संपादित करून त्यांना कर्ज उपलब्ध करून दिले होते. तक्रारदार यांची ३६ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. आरोपींनी पवार यांच्यासह २०० जणांकडून वेगवेगळी कारणे सांगून ३०० कोटी रुपये उकळल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली.

शेअर बाजारात गुंतवणूक
आरोपींच्या संस्थेतील प्रतिनिधी गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन ते शेअर बाजार, कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवायचे. गुंतवणूक केलेल्या रक्कमेतून मिळालेल्या नफ्यातील काही हिस्सा गुंतवणूकदारांना दिला जायचा, तसेच एखाद्याला कर्ज उपलब्ध करून दिल्यास काही हप्ते फेडले जायचे. ज्यांनी गृहकर्ज, वाहन कर्ज घेतले आहे अशा कर्जदारांना अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटच्या प्रतिनिधीकडून संपर्क साधला जात होता. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com