
वृद्धाच्या अवयवदानामुळे दोघांना जीवदान
पुणे, ता. १८ ः वृद्धाच्या अवयवदानामुळे लष्करातील जवानाच्या पत्नीसह आणखीन एकाला जीवनदान मिळाले आहे. रस्त्यातील अपघातात मृत्यू झालेल्या ६५ वर्षीय वृद्धाचे दोन्ही मूत्रपिंड या रुग्णांना मिळाल्याने त्यांचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. तर यातील एक मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पुण्यातील लष्करी रुग्णालयात यशस्वीपणे पार पडली.
एका अपघातात गंभीरपणे जखमी झालेल्या वृद्धाला उपचारासाठी पुण्यातील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांच्यावर उपचार होत असताना त्यांच्या आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. या वेळी डॉक्टरांनी या वृद्धाला मेंदूमृत घोषित केले. तसेच या वृद्धाच्या कुटुंबीयांना अवयवयदानाविषयी विचारण्यात आले. दरम्यान, या कुटुंबाने अवयव दान करण्यासाठी संमती दिल्याने या वृद्धाच्या दोन्ही मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. त्यासाठी लष्करी रुग्णालयातच उपचार घेत असलेल्या लष्करी जवानाच्या पत्नीवर एका मूत्रपिंडाची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. तर नाशिकच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या व मूत्रपिंडाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णावर दुसऱ्या मूत्रपिंड प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांच्या पथकाने कळविले.