
विनयभंग करून पसार झालेल्या रिक्षाचालकाला जेजुरीतून अटक
पुणे, ता. १८ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करून पसार झालेल्या रिक्षाचालकाला चतु:शृंगी पोलिसांनी जेजुरी परिसरात अटक केली. सचिन जगताप (वय ३९, रा. कोंढवे धावडे, उत्तमनगर) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कोथरूड परिसरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. कामानिमित्त ती कोथरूड परिसरातून गुरुवारी (ता. १६) रिक्षाने विद्यापीठाच्या आवारात आली. काम झाल्यानंतर ती रिक्षाने परत जात होती. तेव्हा रिक्षाचालकाने तिच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. तिने रिक्षाचालकाला विरोध करून ती रिक्षातून बाहेर पडली व तीने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर चतु:शृंगी पोलिसांकडून रिक्षाचालकाचा शोध सुरू करण्यात आला. रिक्षाचालक सचिन जगताप जेजुरी परिसरात असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली.