सरकारी कर्मचाऱ्यांचे उद्या थाळीनाद आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरकारी कर्मचाऱ्यांचे 
उद्या थाळीनाद आंदोलन
सरकारी कर्मचाऱ्यांचे उद्या थाळीनाद आंदोलन

सरकारी कर्मचाऱ्यांचे उद्या थाळीनाद आंदोलन

sakal_logo
By

पुणे, ता. १८ ः राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप शनिवारी (ता. १८) पाचव्या दिवशीही चालूच होता. उद्या रविवारी सरकारी सुट्टी असली तरी पुणे वगळता अन्य जिल्ह्यांमधील सरकारी कर्मचारी विविध पद्धतीने आंदोलन करणार आहेत. पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व कर्मचारी येत्या सोमवारी (ता. २०) थाळीनाद आंदोलन करतील. दरम्यान शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांचा संप आणि कर्मचाऱ्यांबद्दल अपशब्द वापरल्याने त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. येत्या सोमवारी आमदार गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय लिपिक हक्क परिषदेचे राज्य सरचिटणीस उमाकांत सूर्यवंशी यांनी सांगितले.

सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी १४ मार्चपासून बेमुदत संप सुरू आहे. दरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी शनिवारी (ता. १८) एका खासगी वाहिनीशी बोलताना कर्मचाऱ्यांना उद्देशून अपशब्द वापरले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी येत्या सोमवारी राज्यभर गायकवाड यांचा विविध मार्गांनी निषेध करण्याचा निर्णय घेतल्याचे सूर्यवंशी म्हणाले. २००५ नंतर सरकारी सेवेत दाखल झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली नाही. तेव्हापासून कर्मचारी सातत्याने आंदोलन करत आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू नसलेल्या कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तिवेतन लागू करण्याचे आश्‍वासन राज्य सरकारने दिले होते. आता बेमुदत संप सुरू केल्यानंतर शुक्रवारी (ता. १७) केवळ त्या आश्‍वासनाची पूर्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यावर कर्मचारी समाधानी नाही. त्यामुळे सरसकट जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचे विविध कर्मचारी संघटनांनी सांगितले.