त्वचेच्या आरोग्यासाठी कोलॅजीन सॉक्स, ग्लोव्हजचा ट्रेंड

त्वचेच्या आरोग्यासाठी कोलॅजीन सॉक्स, ग्लोव्हजचा ट्रेंड

पुणे, ता. १९ ः त्वचेची निगा राखण्यासाठी हल्ली कोलॅजीन सॉक्स आणि ग्लोव्हजचा वापर करण्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. चेहऱ्याबरोबरच पाय आणि हातांची काळजी घेण्यासाठी हा सर्व खटाटोप केला जात आहे. हा ट्रेंड सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहचत आहे.
सोशल मीडियाच्‍या माध्यमातून अनेक गोष्टी सहज आणि झपाट्याने व्हायरल होतात. त्यातील ‘ब्यूटी किंवा स्किनकेअर’साठी असलेल्या टिप्स व उपाय याला महिला वर्गात सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. त्यात अलीकडे स्किनकेअर रूटीनबद्दल बोलत असताना कोलॅजीन हा शब्द अनेकदा चर्चेत असतो. याचे कारण म्हणजेच त्वचेची काळजी किंवा ‘ब्युटी केअर’ म्हटलं, की केवळ चेहऱ्याचीच काळजी सर्वाधिक प्रमाणात घेतली जाते. अशात हात आणि पायांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे हे कोलॅजीन ग्लोव्हज आणि सॉक्स यांचा वापर केला जातो.

कोलॅजीन म्हणजे काय ?
कोलॅजीन म्हणजेच आपल्या त्वचेच्या खालच्या स्तरात असलेले प्रथिनांचे तंतू, यामुळे त्वचा लवचिक व योग्य प्रमाणात ताणलेली राहते. कोलॅजीन हे एक ‘प्रोटीन’ आहे, जे आपल्या त्वचेला रचना, आधार आणि ताकद प्रदान करते. वाढत्या वयाबरोबरच कोलॅजीनचे प्रमाण देखील कमी होण्यास सुरवात होते. यामुळे अनेकदा ‘एजिंग इफेक्ट’ (वय वाढल्याच्या खुणा) दिसू लागतात. त्यामुळे त्वचेला तजेलदार आणि टवटवीत ठेवण्यासाठी हे महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. यासाठी बऱ्याचदा चेहऱ्यावर कोलॅजीन मास्क वापरले किंवा कोलॅजीनयुक्त क्रीम आदींचा वापर होतो. परंतु आता याचे पाय आणि हातातील मोजे देखील उपलब्ध होऊ लागले आहेत.

कोलॅजीनचे महत्त्व
- खराब झालेल्या त्वचेच्या पेशी ‘रिप्लेस व रिस्टोअर’ करण्यास उपयुक्त
- त्वचेच्या नवीन पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्वचेची लवचिकता राखण्यात महत्त्वाची भूमिका
- याचा त्वचेसाठी मॉयश्चरायझर म्हणून वापर फायदेशीर
- जोपर्यंत साबण आणि पाण्याने आपण हात-पाय किंवा चेहरा धूत नाही तोपर्यंत हे त्वचेवर असते

यासाठी करतात वापर
- हात आणि पायांची अतिरिक्त काळजी घेण्यासाठी
- वापरायला सहज आणि सोपे असल्यामुळे वेदना होत नाहीत
- हात आणि पायाच्या त्वचेला मॉयश्चरायझ करते
- या पाय आणि हातमोज्यांमुळे त्वचेसह बोटांनादेखील उपयुक्त
- हात आणि पायांची काळजी घेण्यासाठी आधुनिक दृष्टिकोन
- मेहनत आणि तासनतास वेळ देण्याची गरज नाही
- हात, पाय किंवा चेहऱ्याच्या काळजीसाठी पार्लर किंवा इतर ठिकाणी जाण्याची गरज भासत नाही


हा ट्रेंड असतो, हे परदेशातील काही सोशल मीडियावरील रिल्स, शॉर्ट व्हिडिओमुळे मला समजले. त्यावेळी हा प्रकार काय आहे, हे समजण्यासाठी इंटरनेटवर आणखीन याबाबत वाचले. तसेच हे उत्पादन ऑनलाइन उपलब्ध आहे का? हे ही पाहिले, हे सहजपणे उपलब्ध होते. हा एक सोपा आणि वेळ वाचविणारा पर्याय वाटला.
- खुशबू शाह, नोकरदार तरुणी

कोलॅजीन म्हणजे एक प्रथिन (प्रोटीन) जे त्वचेला रचना, तन्यता (इलस्टिसिटी) आणि आधार देते. खराब किंवा जुन्या झालेल्या त्वचेच्या पेशींना बदलणे किंवा त्याचं पुनरुज्जीवित करणे. तसेच नवीन पेशींची वाढ करणे आणि त्वचेची लवचिकता राखण्यासाठी कोलॅजीन महत्त्वाचे आहे. आपल्या हाता-पायांची अतिरिक्त काळजी घेण्यासाठी हे कोलॅजीनचे ग्लोव्हज आणि सॉक्स म्हणजे पूरक पर्याय आहे. प्रामाणिकपणे, हे एक अत्यंत सोपे आणि सुलभ पर्याय आहेत. ज्याने आपण हाता-पायांवरच्या सुरकुत्या आणि कोरडेपणा काही तासांमध्ये कमी करू शकतो.
- डॉ. निखिल पाटील, त्वचा व केस विकार तज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com