ग्रामीण भागावर ‘एसटी’ रुसली

ग्रामीण भागावर ‘एसटी’ रुसली

पुणे, ता. १९ ः राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील बस गाड्यांची संख्या अजूनही कमी आहे. पूर्वी मंडळाच्या ताफ्यात १८,००० बस गाड्या होत्या. ती संख्या आता केवळ १३ हजार ५०० इतकी झाली आहे. त्याचा परिणाम पुण्यासह राज्यभरातील ग्रामीण भागातील सेवेवर झाला. एकट्या पुणे विभागात रोजच्या ग्रामीण भागातील सुमारे ४११ फेऱ्या रद्द झाल्या आहेत. तर मुक्कामी जाणाऱ्या गाड्यांची संख्याही घटली. पुणे विभागात मुक्कामी जाणाऱ्या गाड्यांची संख्या पूर्वी २०२ होती, ती आता १३० झाली आहे. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील प्रवाशांना बसला आहे.

राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती व बस गाड्यांची स्थिती खराब आहे. सध्या सुमारे पाच हजार एसटी गाड्यांचे आयुर्मान संपल्याने त्यांना प्रवासी सेवेतून बाहेर काढले आहे. तर उर्वरित गाड्या देखभाल-दुरुस्ती, आरटीओ, पोलिस व अन्य तांत्रिक कामांमुळे रस्त्यावर धावत नाही. म्हणजे प्रत्यक्षात रस्त्यावर धावणाऱ्या बस गाड्यांची संख्या आणखीनच कमी आहे. म्हणजे, पाच हजारहून अधिक गाड्या प्रवासी सेवेत नाहीत. ग्रामीण भागात कमी उत्पन्नाच्या मार्गावर फेऱ्यांची संख्या घटवण्यात आली आहे. त्याचा फटका विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह अन्य प्रवाशांना बसत आहे.

या डेपोच्या घटल्या फेऱ्या :
डेपो - पूर्वी - आता
भोर - १४० - १०४
नारायणगांव - ६४४ - ५४४
राजगुरुनगर - ४०३ - ३४८
तळेगाव - १२८ - ६०
शिरूर - १९१ - ९८
सासवड - २३९ - १८०
एकूण - १,७४५ - १,३३४

पुणे विभागाची स्थिती
दैनंदिन प्रवासी संख्या - १ लाख
प्रवासी उत्पन्न - सुमारे ८५ लाख
एसटी बसची संख्या- ८४९
रोजची वाहतूक किमी मध्ये - २ लाख ५० हजार

ग्रामीण भागातील स्थिती
- काही गावांत एसटी बंद किंवा फेऱ्या कमी
- पासधारक विद्यार्थ्यांना चार ते १० किमीचा प्रवास करत शेजारच्या गावात जावे लागते
- विविध कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अडचणी
- एसटीच्या नकाशातूनच अनेक गावे हद्दपार झाल्याने, प्रवाशांची गैरसोय

कोरोनानंतर बसची खरेदी झालेली नाही. त्याचा मोठा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे बस गाड्याची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. भाडेतत्त्वावर व स्वमालकीच्या गाड्या देखील लवकरच प्रवाशांच्या सेवेत धावतील. तेव्हा बस व प्रवाशांची संख्या वाढेल.
- शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, राज्य परिवहन महामंडळ, मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com