
दगडूशेठ हलवाई मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सव
पुणे, ता. १९ ः श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी पुण्यासह देशभरातील दिग्गज कलाकारांचे सादरीकरण हे या महोत्सवाचे वैशिष्टय असेल. हा कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य खुला राहणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली.
हा संगीत महोत्सव २२ ते ३० मार्च दरम्यान गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी ७ ते १० यावेळेत होईल. संगीत महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी (ता. २२) तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते होणार आहे. त्याचदिवशी सकाळी नऊ वाजता मंदिरामध्ये परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्या हस्ते गुढीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या संगीत महोत्सवात शास्त्रीय गायन, कथक नृत्य, व्हायोलीन वादन, लोकगीते, भारुड, पोवाडे, नाट्यगायनाचा समावेश आहे. संगीत महोत्सवाची सुरुवात गायक राहुल देशपांडे यांच्या शास्त्रीय गायन कार्यक्रमाने होणार आहे. हा महोत्सव रसिकांसाठी खुला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.