
बावधनजवळ बस उलटून १४ प्रवासी जखमी
पुणे, ता. १९ : मुंबईहून बंगळूरच्या दिशेने जाणारी खासगी प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात १४ प्रवासी जखमी झाले. बावधन येथील चेलाराम हॉस्पिटलजवळ सेवा रस्त्यावर शनिवारी रात्री हा अपघात झाला.
या संदर्भात वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक येथील शर्मा ट्रॅव्हल्सची खासगी बस मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास बंगळूरला जात होती. बावधन परिसरात सीएनजी पेट्रोल पंपाजवळ बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस सुरक्षा कठडा तोडून सेवा रस्त्यावर उलटली. या अपघातात १४ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी बसचालकासह दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर प्रवाशांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच हिंजवडी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून जखमींना बावधन येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.