
डंपरसह खाणीत पडून मजुराचा मृत्यू
पुणे, ता. १९ : खाणीत डंपरसह पडून एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना भावडी (ता. हवेली) गावात घडली. अर्जुन बाबूराव उराव (वय ३६, मूळ रा. बारीखाय, झारखंड) असे मृत झालेल्या मजुराचे नाव आहे. याबाबत पोलिस कर्मचारी सागर दळे यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भावडी गाव परिसरात खाणीजवळ डंपर लावण्यात आला होता. उराव याने दारूच्या नशेत डंपर सुरू केला. त्याचे नियंत्रण सुटल्यामुळे डंपर खाणीत कोसळल्याने उराव याचा मृत्यू झाला.
न्यायालयातून आरोपीचा पलायनाचा प्रयत्न
पुणे, ता. १९ : शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातून एका आरोपीने पलायन करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेतले. दीपक शिवाजी जाधव (वय २८, रा. कात्रज) असे आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिस हवालदार सचिन शिंदे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. न्यायालयाने जाधव याच्याविरुद्ध वॉरंट बजावले होते. न्यायालयात सुनावणीसाठी आल्यानंतर त्याने पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले. न्यायालयाने जाधव याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.
वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू
पुणे, ता. १९ : भरधाव वाहनाच्या धडकेने एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना पुणे स्टेशन परिसरात घडली. विलास गावडे असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत पोलिस नाईक मधुकर चव्हाण यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गावडे हे अलंकार चित्रपटगृहाजवळून रस्त्याने जात होते. त्या वेळी भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला आहे.