
अप्पासाहेब जेधे यांना अभिवादन
पुणे, ता. २१ ः ‘शतकाच्या दुसऱ्या दशकामध्ये वीज चमकावी तशी महाराष्ट्रात जेधे घराण्याने सामाजिक चळवळ चालू केली. तसेच खरा राष्ट्रवाद कसा असावा, हे सर्व जगाला दाखवून दिले. अप्पासाहेब जेधे व केशवराव जेधे या बंधूनी निस्वार्थपणे कोणत्याही सत्तेची व पदाची अपेक्षा न करता कार्य केले. अप्पासाहेब जेधे यांचे पुण्याच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान होते,’ असे मत सातारा इतिहास संशोधक मंडळ अध्यक्ष डॉ. विजय नलावडे यांनी व्यक्त केले. श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या समाजभूषण बाबूराव ऊर्फ अप्पासाहेब जेधे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीतर्फे बाबूराव ऊर्फ अप्पासाहेब जेधे पुण्यतिथी अभिवादन सभा झाली. या वेळी सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, मानद सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, प्रभारी प्राचार्या डॉ. दीपाली पाटील, रघुनंदन जाधव, सभासद बबनराव जेधे, सत्यजित जेधे, सभासद तानाजी घारे उपस्थित होते. डॉ. अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले. सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. आर. डी. आरेकर यांनी आभार मानले.