गुढीपाडव्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुढीपाडव्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
गुढीपाडव्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

गुढीपाडव्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

sakal_logo
By

पुणे, ता. २० ः गुढीपाडव्याला सुरू होणाऱ्या मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी बुधवारी (ता. २२) शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शास्त्रीय संगीताची मैफल, कथाकथन आदी कार्यक्रमांचा यात समावेश आहे.

‘स्वरंग टीव्ही’ यांच्यातर्फे ‘पाडवा पहाट’ या कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ गायक पं. रघुनंदन पणशीकर आणि विदुषी मंजुषा पाटील यांच्या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ वाजता जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे. नादऊर्जा फाउंडेशन व इंदिरा कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स यांच्या संगीत विभागातर्फे ‘चैत्रस्वर’ या शास्त्रीय संगीताच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी शास्त्रीय गायक अतुल खांडेकर यांचे गायन होणार असून डॉ. सुनील काळे व पं. शौनक अभिषेकी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ५.३० वाजता कोथरुड येथील गांधीभवन सभागृहात हा कार्यक्रम होईल.

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पुणे विभागीय कार्यालय आणि भारतीय विद्या भवन तसेच इन्फोसिस फाउंडेशन यांच्यातर्फे ‘चैत्रपालवी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० वाजता सेनापती बापट रस्त्यावरील सरदार नातू सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ कथक नृत्यगुरू पं. मनिषा साठे यांची नृत्यप्रस्तुती आणि विदुषी मंजिरी आलेगावकर यांचे गायन होणार आहे.

अक्षरोत्सवाचे आयोजन
गुढीपाडव्यानिमित्त ‘कथा बाय स्नेहल बाकरे’ आणि ‘झंकार स्टुडिओ पब्लिशिंग’तर्फे ‘ब्लॉक ते ब्लॉग’ हा अकरा मराठी कथांचा अक्षरोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम गुरुवारी (ता. २३) सायंकाळी ६ वाजता फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील हॉटेल आशिष प्लाझा येथे होणार आहे. या वेळी ‘अण्णा माझे चुकले का?’ या कथेचे सादरीकरण आणि सुनीता ओगले यांची मुलाखत होणार आहे.