
अवकाळीचा सात तालुक्यांना फटका
पुणे, ता. २० ः गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ४३ गावांतील १ हजार २२१ शेतकऱ्यांच्या सुमारे ४७८.१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सोमवारी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा संप संपुष्टात आल्याने उद्यापासून (मंगळवार) पंचनाम्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचा सात तालुक्यांना फटका बसला. इंदापूर येथे वीज पडून १९ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर एकूण ४४.३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या काळात हवेली, मुळशी, भोर, मावळ, जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरुर या तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला. कृषी आणि महसूल विभागाकडून पिकांच्या नुकसानाची माहिती गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर संपाला सुरुवात झाली. त्यामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम थांबले होते.
दरम्यान, १६, १७ आणि १८ मार्च रोजी जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये जिल्ह्यातील सात तालुक्यांतील ४३ गावांतील ४७८ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. यात १ हजार २२१ शेतकरी बाधित झाले आहेत. सर्वाधिक फटका मुळशी तालुक्यातील १९ गावांना बसला. तर जुन्नरमधील आठ, पुरंदरमधील सात, आंबेगावमधील पाच, हवेलीतील दोन, शिरूर आणि मावळातील प्रत्येकी एक गावांतील शेतपिकांचे नुकसान झाले आहे.
आंबेगावात सर्वाधिक नुकसान
सर्वाधिक नुकसान आंबेगाव तालुक्यातील २५२.७० हेक्टरवर झाले आहे. त्याखालोखाल जुन्नरमध्ये १७४ हेक्टर, पुरंदरमध्ये २३.५० हेक्टर, शिरूरमध्ये १८ हेक्टर, मुळशीत ५.५० हेक्टर, हवेलीत ३.२० हेक्टर, तर मावळात १.२० हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे.
या पिकांचे नुकसान
पुरंदरमध्ये गहू, कलिंगड, जुन्नरमध्ये कांदा, भाजीपाला, गहू आणि द्राक्ष, शिरूरमध्ये कांदा, भाजीपाला आणि कलिंगड, आंबेगावात कांदा, भाजीपाला, भुईमूग, बाजरी, गहू, चारा पिके, डाळिंब, टोमॅटो आणि मिरची, हवेलीत ज्वारी, मावळात आंबा आणि मुळशीत भाजीपाला, गहू, बटाटा, हरभरा आणि वाटाणा पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे.