महावितरणला थकबाकीचा ‘शॉक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavitaran
महावितरणला थकबाकीचा ‘शॉक’

Mahavitran Arrears : महावितरणला थकबाकीचा ‘शॉक’

पुणे - महावितरण पुणे प्रादेशिक विभागात फेब्रुवारी महिनाअखेर २५ लाखांहून अधिक वीज ग्राहकांकडे १४ हजार ३५४ कोटी रुपयांची वीजबिलाची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरावी आणि वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणचे पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

ग्राहकांनी थकबाकीचा भरणा केला, तर दरवाढ कमी प्रमाणात होऊन याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. तसेच थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की येणार नाही. म्हणून ग्राहकांनी आपले बिल वेळेत भरावे असेही नाळे म्हणाले.

थकबाकीचे परिणाम
- महावितरणवर महागड्या दराने कर्ज घेण्याची वेळ
- ग्राहकांना वीज दरवाढीचा फटका
- वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की

कोणाकडे किती थकबाकी (पुणे प्रादेशिक विभाग)
ग्राहक - थकबाकी (रुपयांत)

- १२ लाख ५३ हजार ९७० (कृषिपंप) - १२ हजार ४९९ कोटी
- १२ लाख ६३ हजार ५२९ (अकृषक) - एक हजार ८६४ कोटी
(आकडेवारी फेब्रुवारी २०२३ पर्यंत)

सार्वजनिक पथदिवे योजनेकडे सर्वाधिक थकबाकी
अकृषक ग्राहकांपैकी सर्वात जास्त थकबाकी ही सार्वजनिक पथदिवे योजनेकडे असून त्याकडे १ हजार १९६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेकडे ४१७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. एकूण १० लाख ६७ हजार ५६० घरगूती ग्राहकांकडे १४३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. एकूण एक लाख १७ हजार ३३४ वाणिज्यिक ग्राहकांकडे ४४ कोटी रुपयांची थकबाकी आहे तर २२ हजार ५४२ औद्योगिक ग्राहकांकडे ३७ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

३१ मार्चपर्यंत ३० टक्के सूट
शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासनाने नविन कृषिपंप धोरण २०२० तयार केले असून ३१ मार्चपर्यंत थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना थकबाकीवर ३० टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच विलंब आकार व व्याज पूर्णतः माफ करण्यात येत आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सुटीच्या दिवशी वीज बिल भरणा केंद्र सुरू
- महावितरण पुणे प्रादेशिक विभागातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यात थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. ग्राहकांना वीज बिल भरणे सोईचे व्हावे म्हणून मार्च अखेरपर्यंत शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येत आहे.

ऑनलाइन वीजबिल भरण्याची सोय
- www.mahadiscom.in संकेतस्थळ व ॲप
- ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’