
उन्हाचा चटका पुन्हा वाढणार
पुणे, ता. २० ः आठवडाभरापासून ढगाळ असलेले वातावरण आता निवळले असून, दिवसा उन्हाची तिव्रता वाढत चालली आहे. त्यामुळे शहरात पुढील तीन दिवस उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दिवसभर आकाश निरभ्र राहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
शहरातील कमाल तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. सोमवारी शहरातील कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १६.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. आकाश दिवसभर अंशतः ढगाळ होते. मात्र, कोठेही पावसाची नोंद झाली नाही. तसेच दिवसभरात उन्हाचा कडाकाही चांगलाच जाणवत होता. राज्यातही आता विविध भागात सुरू असलेल्या वादळी पावसाने उघडीप दिली आहे. मंगळवारी (ता. २१) विदर्भात विजांसह पावसाची शक्यता कायम आहे, तर उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३१ ते ३५ अंशांच्या दरम्यान होते. किमान तापमानाचा पारा १२ अंशांच्या पुढे कायम आहे. दक्षिण कर्नाटकपासून मराठवाडा, पश्चिम विदर्भापर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा तमिळनाडू ते छत्तीसगडपर्यंत विस्तारला आहे.