
इस्लाम धर्मांतील सर्वांत पवित्र महिना
इस्लाम धर्माचे पंचांग हे चंद्रावर अवलंबून असल्यामुळे या वर्षाला ‘चंद्रवर्ष’ अथवा ‘चांद्रवर्ष’ असे म्हटले जाते व त्यामुळेच या वर्षातील प्रत्येक महिना हा प्रत्येकी ३० दिवसांचा असतो. इस्लाममध्ये या चंद्रवर्षाची सुरुवात ‘मोहरम’ या महिन्याने होते, तर संपूर्ण वर्षात सफर, रज्जब, शाबान, रमजान, शव्वाल इ. नावांनी एकूण १२ महिने असतात, या १२ महिन्यांपैकी इस्लाम धर्मात रमजान हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो आणि म्हणूनच समस्त मुस्लिम बांधव रमजान या महिन्याची वर्षभर वाट पाहत असतात.
शाबान महिन्याच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी मुस्लिम बांधवांना चंद्रदर्शन झाले म्हणजेच चंद्राची कोर दिसली की, त्यांना अत्यानंद होतो. चंद्राचे दर्शन होताच, ते आपल्या नातेवाइकांना किंवा मित्रांना एकमेकांना चाँद मुबारक’, ‘रमजान मुबारक’ अशा शुभेच्छा देतात. रमजान या महिन्याला उपवासाचा महिना असेही म्हटले जाते.
‘इस्लाम’ हा शब्द व्यक्तीवाचक किंवा जातिवाचक नाही, इस्लाम याचा अर्थ परमेश्वरास संपूर्ण शरण जाणे असा आहे. इस्लाम हा कोणत्याही एका राष्ट्राचा वा जमातीचा धर्म नाही, तर परमेश्वरावर नितांत निष्ठा ठेऊन, सदाचाराने वागणाऱ्या व मानवांची सेवा करणाऱ्या अशा सर्वांचा हा धर्म आहे. इस्लाम धर्मात वर्णिलेला परमेश्वर हा कोणत्याही एका राष्ट्राचा किंवा धर्माचा नसून, तो सर्व जगाचा परमेश्वर (रब्बुल आलमीन) आहे, म्हणजेच पसायदानामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींनी आळविलेला ‘विश्वात्मक देव’ आहे, असेच म्हणावे लागेल.
हाच र्इश्वर सृष्टीचा आणि सृष्टीतील सर्व वस्तूंचा निर्माता, नियंता व मालक आहे. याच र्इश्वराने संपूर्ण मानवजातीसाठी संपूर्ण मार्गदर्शन (परिपूर्ण जीवन व्यवस्था) ‘पवित्र कुरान’द्वारे बहाल केली आहे आणि पवित्र कुरानची ही र्इश्वरवाणी ‘अल्लाहचे दूत’ हजरत जिब्रार्इल (अले) यांनी पैगंबर मुहंम्मद (सल्ल) यांच्यावर टप्प्याटप्प्याने अवतरित केली आणि या पवित्र कुरान धर्मग्रंथाचे संपूर्ण अवतरण ‘रमजान’ महिन्यात झाले म्हणूनच ‘रमजान’ हा महिना समस्त मुस्लिम बांधव अत्यंत पवित्र मानतात.
(लेखक, माजी कुलगुरू व विश्व शांती केंद्र (आळंदी), पुणेचे सल्लागार आहेत)
इफ्तार ः ६.५४ (गुरुवारी सायंकाळी)