निविदा प्रक्रियेतील विलंबामुळे गुढीपाडव्यापासून शिधा वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निविदा प्रक्रियेतील विलंबामुळे 
गुढीपाडव्यापासून शिधा वाटप
निविदा प्रक्रियेतील विलंबामुळे गुढीपाडव्यापासून शिधा वाटप

निविदा प्रक्रियेतील विलंबामुळे गुढीपाडव्यापासून शिधा वाटप

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : गुढीपाडव्याला ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला खरा, परंतु निविदा प्रक्रियेला विलंब झाल्याने पाडव्याला शिधापत्रिकाधारकांना हा शिधा मिळणे अपेक्षित असताना या दिवसाचा मुहूर्त साधून आता वाटप सुरू करण्याची वेळ सरकारवर आली आहे. मात्र, आंबेगाव तालुका वगळता उर्वरित ग्रामीण भाग आणि पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांत अद्याप या शिधाचे वाटप सुरू झालेले नाही.

दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, परंतु त्यासाठी निविदा प्रक्रिया करण्यास विलंब झाल्यामुळे जिल्ह्यात किरकोळ स्वरुपात तो प्राप्त झाला. मात्र, आता बऱ्यापैकी वस्तूंची आवक सुरू झाली आहे. जिल्ह्यात पाच लाख ६१ हजार ५९३ लाभार्थी असून यासाठी ३५ टक्के अर्थात एक लाख ९४ हजार २०० किलो रवा प्राप्त झाला आहे. तर तीन लाख १८ हजार ५६० किलो साखर (५७ टक्के), चार लाख सहा हजार ७२३ किलो चणाडाळ (७२ टक्के), तर एक लाख १७ हजार ५०० किलो पामतेल (२१ टक्के) प्राप्त झाले आहे. साखर, चणाडाळ, रवा या वस्तू स्थानिक स्तरावर उपलब्ध असल्याने त्याची आवक बऱ्यापैकी झाली आहे. मात्र, पामतेलाची आवक परराज्यातून होत आहे. त्यामुळे त्याला पोहोचण्यास विलंब होत आहे. आंबेगाव तालुक्यात या चारही वस्तू प्राप्त झाल्याने तेथे मंगळवारपासून शिधा वाटपाचे काम सुरू झाले आहे. बुधवारी आणखी काही तालुक्यांमध्ये पामतेल मिळण्याची शक्यता असल्याने तेथेही वाटप सुरू होईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी दिली.

पुणे शहरात आणखी दोन दिवस प्रतीक्षा
पुणे शहरात तीन लाख १७ हजार लाभार्थी आहेत. मात्र, येथे आतापर्यंत केवळ रवा, पामतेल प्राप्त झाले असल्याने शिधावाटप करण्यासाठी आणखी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. शासन निर्णयानुसार हे वाटप आंबेडकर जयंतीपर्यंत करायचे आहे. मात्र, महिनाअखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शहर, जिल्ह्यात शिधा वाटपाचे काम पूर्ण होईल, असेही माने यांनी स्पष्ट केले.