
खराडीतील मिळकतींना मिळणार प्रॉपर्टी कार्ड
पुणे, ता. ३० : वडगाव शेरीपाठोपाठ आता ईटीएस मशिन आणि रोव्हर तंत्रज्ञानाबरोबरच ड्रोन तंत्रज्ञनाचा वापर करून खराडी येथील मिळकतींच्या मोजणीचे काम भूमी अभिलेख विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे ८ चौरस किलोमीटर असलेल्या खराडीतील प्रत्येक मिळकतींना कायदेशीर मालकी हक्काचा पुरावा असलेले प्रॉपर्टी कार्ड मिळण्यास मदत होणार आहे.
राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटी सर्व्हेचे काम झाले आहे, परंतु तेथे मिळकतींचे सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड अशी दोन्ही सेवा सुरू आहेत अथवा केवळ सातबारा उतारा सुरू आहे. अशा ठिकाणी जागांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराच्या वेळी सोईनुसार सातबारा उताऱ्यांचा वापर केला जातो. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. फसवणुकीचे प्रकारदेखील वाढत आहेत. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाने सिटी सर्व्हे झालेल्या भागातील सातबारा उतारे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाने ‘एनआयसी’च्या मदतीने संगणक प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीचा वापर करून प्रायोगिक तत्त्वावर वडगाव शेरी या गावात जीएआयएस मॅपिंगच्या माध्यमातून नुकताच एक प्रकल्प राबविला. त्यात रोव्हर आणि ईटीस मशिनचा वापर करून अवघ्या ३५ दिवसांत या गावाची मोजणी पूर्ण करण्याचा नवा विक्रम भूमी अभिलेख विभागाने केला.
प्रॉपर्टी कार्डचा काय होणार फायदा
प्रॉपर्टी कार्ड हे महसूलविषयक महत्त्वाचा मालकी हक्काचा पुरावा असल्याने सदनिकाधारकाचे हितसंबंध जोपासले जाणार आहेत. प्रॉपर्टी कार्डवर इमारतीखालील सर्व क्षेत्र, तसेच प्रत्येक सदनिकाधारकाच्या वैयक्तिक मालकीच्या क्षेत्राची स्वतंत्र नोंद असणार आहे. त्यामुळे सदनिकाधारकाचा जागेवरील हक्क अबाधित राहणार आहे. तसेच सदनिकेची खरेदी-विक्री करताना उद्भवणारे वाद मिटणार आहेत. एकाच सदनिका वेगवेगळ्या बॅंकेकडे गहाण ठेवून त्यावर कर्ज उचलून फसवणूक करण्याच्या प्रकारालादेखील आळा बसणार आहे.
महापालिकेचा काय फायदा होणार
- महापालिकेच्या मालकीच्या मिळकतींची हद्द निश्चित होणार
- रस्त्यांची क्षेत्र, लांबी, रुंदी यांची माहिती मिळणार
- मिळकतींची संख्या निश्चित होणार
- मिळकतकराच्या माध्यमातून महसूल वाढण्यास मदत
- सरकारी जमिनींची माहिती जमा होणार
यापूर्वी वडगाव शेरी गावाची मोजणी करण्यात आली आहे. आता रोव्हर, ईटीएस मशिन आणि ड्रोन अशा तिन्ही तंत्रज्ञानाचा वापर करून खराडी गावाच्या मोजणीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या गावातील सर्व मिळकतदारांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप केले जाणार आहे.
- निरंजन सुधांशू, जमाबंदी आयुक्त