
चुकवू नये असे काही
१) अनुभूती संगीत सभा
अनुप जोशी यांची तबला ॲण्ड बियाँड संगीत संस्था आणि प्रज्ञा देव यांची निर्विकल्प संगीत संस्था यांच्यातर्फे दोन दिवसीय ‘अनुभूती संगीत सभा’ या तबलावादनाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी अनुप जोशी यांचे शिष्य अनुराग अलूरकर आणि प्रसिद्ध तबलावादक ओजस अढिया यांचे एकल तबला वादन होईल. दुसऱ्या दिवशी उस्ताद अल्लारखाँ यांचे ज्येष्ठ शिष्य अमृत बापट आणि अनुव्रत चॅटर्जी यांचे एकल तबला वादन अनुभवता येईल.
कधी ः शनिवार (ता. २५) व रविवार (ता. २६)
केव्हा ः सायंकाळी ६ वाजता
कुठे ः शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृह, कर्नाटक हायस्कूल, एरंडवणे
२) ‘ख्याल विमर्श’
ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे आयोजित ‘ख्याल विमर्श’ या उपक्रमांतर्गत पं. सत्यशील देशपांडे ‘शास्त्रीय संगीतातील बंदिशीची भूमिका’ या विषयावर रसिकांशी संवाद साधणार आहेत. संवादात्मक कार्यक्रमात हा पाचवा भाग आहे. यावेळी पं. देशपांडे यांना सृजन देशपांडे हे सहगायनाची आणि अभिजित बारटक्के तबल्याची साथसंगत करणार आहेत.
कधी ः शनिवार (ता. २५)
केव्हा ः सायंकाळी ६ वाजता
कुठे ः गांधर्व महाविद्यालय, विष्णू विनायक स्वरमंदिर, मेहुणपुरा, शनिवार पेठ
३) ‘क्लिओपात्रा’
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘क्लिओपात्रा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘क्लिओपात्रा’च्या प्रेमकहाणीवर आधारित सादरीकरण या कार्यक्रमात कथकलीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याची संकल्पना प्रबल गुप्ता यांची असून संगीत सदनम सिवदास यांचे आहे. या सादरीकरणासाठी सदनम शिवदासन व सदनम ज्योतिष बाबू गायन करणार आहेत.
कधी ः शनिवार (ता. २५)
केव्हा ः सायंकाळी ५.३० वाजता
कुठे ः भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता
४) ‘नर्तन प्रभा’
‘स्वरमयी गुरुकुल’तर्फे डॉ. प्रभा अत्रे यांच्या बंदिशींवर आधारित ‘नर्तन प्रभा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कथक नृत्यांगना डॉ. मंजिरी देव आणि सहकारी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन मुकुंदराज देव यांचे असून त्यांना तबल्याची साथ रोहित देव, संवादिनीची साथ मंदार दीक्षित आणि गायनाची साथ श्रुती बुजरबरवा देणार आहेत.
कधी ः रविवार (ता. २६)
केव्हा ः सायंकाळी ६ वाजता
कुठे ः स्वरमयी गुरुकुल, संभाजी बागेसमोर, हॉटेल शिवसागर गल्ली, जंगली महाराज रस्ता