तरुणींनो, स्पर्धा परीक्षांचा बाऊ कशाला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणींनो, स्पर्धा परीक्षांचा बाऊ कशाला?
तरुणींनो, स्पर्धा परीक्षांचा बाऊ कशाला?

तरुणींनो, स्पर्धा परीक्षांचा बाऊ कशाला?

sakal_logo
By

अतिरिक्त आयुक्त, जीएसटी, पुणे या पदावर सध्या कार्यरत असलेल्या वैशाली पतंगे यांना, तरुणींच्या स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याच्या सध्याच्या दृष्टिकोनाची समीक्षा करावीशी वाटते. प्रशासकीय सेवेत जाऊन लोककल्याणकारी कामांची संधी या परीक्षांतील यशामुळे मिळते. घर, संसार, मूल याच्या बरोबरीने प्रशासकीय सेवेतील सेवेतही समांतरपणे गुणवत्तापूर्ण विकास शक्य असल्याचे त्या आवर्जून सांगतात.
वैशालीताई म्हणाल्या, स्पर्धा परीक्षांसाठी पुण्यात शहरी व ग्रामीण भागांतील तरुणीही मोठ्या संख्येने प्रयत्न करताना दिसतात. ही परीक्षा त्यांना आव्हानात्मक वाटण्याची काही कारणे आहेत. विद्यापीठीय परीक्षांप्रमाणे ही परीक्षा मर्यादित काळात संपून निकाल लागला, असे होत नाही. कोण कितव्या प्रयत्नात यशस्वी होईल, त्यानंतरही सेवेत निवड केव्हा होईल, याचा अंदाज नसतो. पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही तर, ‘आता पुरे, लग्न करून टाकू’, असे दडपण बरेचदा पालकांकडून मुलींवर टाकले जाते. समजा तिने लग्न केले तर या परीक्षांकडे मुलींनी पूर्णपणे पाठ फिरवण्याचे प्रमाण जास्त दिसते. वास्तविक लग्न व परीक्षा देत यश मिळवून प्रशासनात येणे, या दोन्हींचा समतोल साधता येतो. लग्न केले म्हणून कामात उगीचच सवलती मागणे, बदल्यांना घाबरणे, मोठ्या जबाबदाऱ्या टाळणे हे योग्य नाही. याऐवजी विचारपूर्वक नियोजन व उत्तम अमलबजावणीतून काम व प्रपंचातही यश मिळवता येते.
वैशालीताई म्हणाल्या, मी मूळची कराडची. बारावीला गुणवत्ता यादीत आले. नंतर पुण्याच्या स. प. महाविद्यालयातून इंग्रजी साहित्यात बी.ए. व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम.ए. केले. कविता लिहिते. मराठी, संस्कृत व इंग्रजी साहित्याची आवड जोपासली आहे. साहित्य विषयक अनेक सभा, संमेलनांमध्ये व्याख्यानासाठी निमंत्रित असते. त्यामुळे या तिन्ही साहित्य विषयक ताज्या घडामोडींचा मागोवा सतत घेत असते.

हा सल्ला लक्षात ठेवा
राज्य सेवा आयोगाच्या परीक्षांमधून यश मिळालेल्या तरुणींना तेहतीस टक्के महिला आरक्षणाच्या तरतुदीनुसार सुरक्षित नोकरी, अधिकार देणारे पद व आपल्या एका निर्णयामुळे अनेकांच्या आयुष्यात विकासात्मक योगदान देण्याची संधी मिळते. शासन, प्रशासनाच्या चौकटीत राहूनही विविध प्रकारची लोककल्याणकारी कामे करता येतात. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतच लोकांच्या हिताबद्दल खूप छान सांगितले आहे. आपली राज्य घटना ही मानवी विकासाचे निर्देशांक किती आनंददायी असल्याचे सांगते. प्रशासकीय पदांवरून अधिकाधिक विधायक कार्याचे योगदान करण्यासाठी तरुणींनी स्पर्धा परीक्षांकडे वळावे, असा सल्ला वैशालीताई देतात.

अनुभवाचे बोल
- मी आधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली.
- लग्न केले आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन तिच्यात यश मिळवले.
- या परीक्षांची तयारी, यश मिळाल्यावर विशिष्ट पदासाठीची निवड, ती जबाबदारी व लग्न आदी मुद्द्यांची गुंतागुंत होऊ न देता त्यांचा योग्य ताळमेळ राखणे अवघड नाही, हे अनुभवाने सांगते.
- मुली स्वतःच्या लग्नात मेकअप, वेशभूषा, ठिकाण, मेनू, समारंभ कसा असावा याबाबत आता स्वतः जागरूक व आग्रही राहतात. मात्र लग्नानंतरचे आपले आयुष्य कसे असावे, याबाबत सखोल विचार केलेला नसतो.
- प्रशासकीय अधिकारी म्हणून आपली कारकीर्द व संसार यांच्या समतोलासाठी त्यांनी, स्त्री स्वातंत्र्य व समानतेचा अधिकार वापरून जीवनसाथीशी चर्चा करून आखणी करावी.


मुलाच्या संगोपनाकडेही हल्ली प्रकल्पासारखे पाहिले जाते. याऐवजी संयुक्त कुटुंबातील सदस्यांशी नाते जोपासून तणावरहित पद्धतीने मूल वाढवता येते. अशा अनेक पैलूंचा चौफेर विचार करून तरुणींनी घरसंसार व प्रशासकीय सेवा, या दोन्ही फळ्यांवर उत्तम कामगिरीसाठी पावले उचलावीत. नियोजन, व्यवस्थापनात सकारात्मक ऊर्जा असली की, बरेच काही साध्य करता येते.
- वैशाली पतंगे, अतिरिक्त आयुक्त, जीएसटी, पुणे