उंचच उंच उभारली स्त्री प्रतिष्ठेची गुढी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उंचच उंच उभारली स्त्री प्रतिष्ठेची गुढी
उंचच उंच उभारली स्त्री प्रतिष्ठेची गुढी

उंचच उंच उभारली स्त्री प्रतिष्ठेची गुढी

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : कुठे पाण्याचा सडा मारण्यासाठी उडालेली घाई, तर कुठे रांगोळी काढण्याची लगबग.. कुठे हारांची गुंफण, तर कुठे उदबत्त्यांचा सुगंध.. अशा दरवळलेल्या वातावरणात स्त्री प्रतिष्ठेची गुढी उंचच उंच उभारून तनिष्का सदस्यांनी ‘तनिष्का व्यासपीठा’चा दहावा वर्धापनदिन मोठ्या दिमाखदार पद्धतीने साजरा केला.
पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यांमध्ये तनिष्का सदस्यांनी मोठ्या उत्साहात स्त्री प्रतिष्ठेची गुढी उभारली. शहरामध्ये कोथरूड, कोंढवा, सुखसागरनगर, सातारा रस्ता, कात्रज, सिंहगड रस्ता, धायरी, सहकारनगर, येरवडा, सांगवी, चिखली तर भोर, नसरापूर, जुन्नर, बारामती, सासवड अशा विविध ठिकाणी गुढी उभारून ‘तनिष्का’चा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. सहकारनगर येथे श्री गजानन महाराज मंदिरात तनिष्का सदस्यांच्या उपस्थितीत गुढी उभारण्यात आली. कोथरूडमध्ये गुढी उभारण्यासाठी महिला पोलिसांनी आवर्जून उपस्थिती लावली. संगीता जगताप (कोथरूड), अनीता कामठे, विद्या धांडेकर (कोंढवा), अश्विनी उत्तरकर (सुखसागरनगर), पौर्णिमा पवार (सहकारनगर), स्वाती डिंबळे (कात्रज) आदी तनिष्का गटप्रमुखांनी उभारलेल्या गुढ्या वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या.

‘तनिष्कां’कडून कौतुकपत्र
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, हा वर्धापनदिन तनिष्का सदस्यांकडून वेगळ्या संकल्पनेने साजरा करण्यात आला. समाजसेवा, आरोग्यसेवा, शासकीयसेवा, पोलिस, प्रशासन अशा विविध क्षेत्रांत सामाजिक जाण ठेऊन कार्यरत असणाऱ्या महिलांना तनिष्का गटांच्या वतीने कौतुकपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी उभारली गुढी
बालग्राम महाराष्ट्र संचलित ‘येरवडा बालाग्राम’मध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुलभा क्षीरसागर यांच्या तनिष्का गटाने गुढी उभारली. त्यानंतर गमती-जमती करत येथील मुलांनी तनिष्का सदस्यांसोबत चविष्ट भेळ खाण्याचा आनंदही लुटला.