
मुहूर्त साधत झाली दागिन्यांची खरेदी
पुणे, ता. २२ : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीदारांची संख्या वाढल्याने बुधवारी सराफ बाजाराला मोठी झळाळी आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १५ ते २० टक्क्यांनी खरेदी वाढल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली.
गेल्या पाच दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात वाढ होत आहे. त्यामुळे खरेदीसाठी थांबलेल्या अनेकांनी आजचा मुहूर्त साधत त्यांच्या आवडीच्या दागिन्यांची खरेदी केली. या सर्वांत लग्नासाठी आवश्यक असलेल्या दागिन्यांची सर्वाधिक विक्री झाली. गुंतवणूक म्हणून वेढणीलादेखील मोठी मागणी होती. आगामी लग्नसराई, भावात होत असलेली वाढ यामुळे यंदा लग्नाच्या दागिन्यांची जास्त खरेदी झाली. शनिवार आणि रविवारपासून सुरू झालेल्या गर्दीने आज उच्चांक गाठला. अनेक ग्राहकांनी आधीच बुकिंग करून ठेवले होते व आज डिलिव्हरी घेतली, अशी माहिती व्यावसायिकांनी दिली.
नागरिकांना आकर्षित करण्यासाठी सराफ व्यावसायिकांकडून गुढीपाडव्याच्या निमित्ताने विविध सवलतीदेखील जाहीर करण्यात आल्या होता. त्याचा ग्राहकांनी फायदा घेतल्याचे चित्र सराफ बाजारात पाहायला मिळाले.
या दागिन्यांना पसंती
वेढणी, मंगळसूत्र, गंठण, मिनी गंठण, बांगड्या, पाटल्या, चेन, ब्रेसलेट, कानातले
दरवर्षीप्रमाणे वेढणीला मोठी मागणी होती. त्याचबरोबर लग्नासाठीच्या दागिन्यांचीदेखील खरेदी नागरिकांनी केली. तयार दागिन्यांना पसंती होती. लग्नाच्या जवळ आलेल्या तारखा आणि गुढीपाडवा यामुळे यंदा उलाढालीत चांगली वाढ झाली आहे.
- अतुल अष्टेकर, भागीदार, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स
२२ मार्चचे भाव
सोने (प्रतिदहा ग्रॅम)
२४ कॅरेट - ५८९८४
२२ कॅरेट - ५४८९६
चांदी - ६८९०० (प्रतिकिलो)