
पोलिसांनी जप्त केलेल्या कारचीच चोरी
पुणे, ता. २३ : मोकानुसार कारवार्इ केलेल्या गुन्ह्यात वापरलेली आणि पोलिसांनी चौकशीसाठी जप्त केलेली कार चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत कारमालकाने न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पोलिस आयुक्तांना दिले. मोका न्यायालयाचे विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी पोलिस आयुक्तांना संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून याबाबत एका महिन्यात अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.
मोकाच्या गुन्ह्यातील आरोपी असलेले कृष्णा सुरेंद्र सिंग यांची गाडी जप्त करण्यात आली होती. कार परत मिळण्यासाठी त्यांनी विशेष न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने तक्रारदाराला त्यांची कार परत करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाचा आदेश घेऊन सिंग हे येरवडा पोलिस ठाण्यात गेले होते. तक्रारदार वाहतूक विभागाच्या कार्यालयाच्या ठिकाणी कार शोधायला गेले. मात्र, त्यांना तेथे कार आढळून आली नाही. त्यामुळे सिंग याला येरवडा पोलिसांनी दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशीही त्यांना गाडी मिळाली नाही, असे तक्रारदाराचे वकील ॲड. सोमनाथ भिसे यांनी दाखल केलेल्या दाव्यात नमूद केले आहे.
गाडी न मिळाल्याने सिंग याच्या वतीने अॅड. भिसे यांनी पुन्हा न्यायालयात जाऊन पोलिसांनी गाडी परत केली नसल्याचा अर्ज दिला. या अर्जावर न्यायालयाने म्हणणे मागवले. त्यावर पोलिसांनी न्यायालयाला लेखी अहवाल सादर करून, सिंग यांची कार दोन-तीन व्यक्ती चोरून नेत असतानाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याची माहिती दिली. हे फुटेज सप्टेंबर २०२२ चे आहे. याबाबत आम्ही जानेवारी २०२३ मध्ये गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी न्यायालयास सांगितले.
गाडी परत करण्याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सिंग वाहतूक विभागाच्या कार्यालयाच्या ठिकाणी गेले असता त्यांना कार मिळाली नाही. त्यामुळे न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने हा आदेश दिला. न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- अॅड. सोमनाथ भिसे, तक्रारदार आरोपीचे वकील.