शाळकरी विद्यार्थी होतायेत स्पर्धा परीक्षेसाठी सज्ज

शाळकरी विद्यार्थी होतायेत स्पर्धा परीक्षेसाठी सज्ज

पुणे, ता. २४ : आपल्या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी व्हावे, म्हणून त्या-त्या वर्गातील विद्यार्थ्यांवर शिक्षक अधिक मेहनत घेतात, हे चित्र सर्वत्र पहायला मिळते. परंतु विद्यार्थ्यांच्या मूलभूत ज्ञानाच्या कक्षा अधिकाधिक रूंदावून त्यांच्यातील बौद्धिक क्षमता, कौशल्ये विकसित करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना अवघ्या इयत्ता दुसरीपासूनच विविध स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज करण्याचा प्रयत्न आंबेगाव तालुक्यतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांडोली बुद्रुक येथील शिक्षक करत आहेत.

मंचरच्या उत्तर-पूर्वेस तीन किलोमीटर अंतरावर असणारी ही इयत्ता पहिली ते सातवीची शाळा. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण अशी ओळख असणाऱ्या या शाळेत २८२ पटसंख्या असून दहा शिक्षक कार्यरत आहेत. शाळेची स्थापना १८६२ मध्ये झाली. या शाळेत इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंददायी शिक्षण पद्धती आणि कौशल्याधिष्ठित मूल्यमापनाद्वारे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास घडवून आणणे शक्य होत आहे. पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांमधील बौद्धिक क्षमता विकसित करण्यावर शाळेतील शिक्षक विशेष लक्ष देत आहेत. त्यामुळेच शाळेतील विद्यार्थी विविध शिष्यवृत्ती परीक्षांबरोबरच जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेश परीक्षा अशा परीक्षांमध्ये यशस्वी ठरत आहेत.

अशी केली जाते स्पर्धा परीक्षेची तयारी
- विद्यार्थ्यांमधील मूलभूत क्षमता विकसित होण्यासाठी आवश्यक ज्ञान दिले जाते
- प्रज्ञावान मुलांना अधिकचे ज्ञान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात
- इयत्ता दुसरीच्या वर्गापासूनच स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम घेतला जातो
- बौद्धिक क्षमता, सामाजिक भान, कौशल्य विकास यावर भर
- जादा तास, प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव

इयत्ता दुसरीपासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार केले जाते. त्यासाठी नियमित अभ्यासक्रम वेळेपूर्वी पूर्ण करून मुलांच्या बौद्धिक क्षमता विकसित करण्यासाठी विशेष लक्ष दिले जाते. परिणामी शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अव्वल ठरतात. याबरोबरच उच्च शिक्षणातील प्रवेश परीक्षांच्या अभ्यासाचे मूलभूत ज्ञान हे शालेय शिक्षणातूनच बळकट होत असल्याने विद्यार्थ्यांना ते फायदेशीर ठरते.
- रोहिदास सोनवणे, उपशिक्षक, जिल्हा परिषद शाळा चांडोली बुद्रूक

शाळेतील अन्य उपक्रम
- दर शनिवारी ‘सुंदर माझे अक्षर’ उपक्रम
- आठवड्यातून एक तास योगासने
- विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमता विकसित करण्यावर भर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com