
पुण्यातील प्रियांकाची आंतरराष्ट्रीय पातळीवर भरारी
महिमा ठोंबरे ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २४ ः आसाम येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियायी खो-खो स्पर्धेत भारतीय महिलांच्या संघाने विजेतेपद पटकावले. या संघाच्या यशात सिंहाचा वाटा उचलला तो पुण्यातील चऱ्होली गावातील मौजे वडमुखवाडी येथील एका २३ वर्षीय तरुणीने. खेळाचा कोणताही वारसा नसताना केवळ जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर तिने आपली खो-खो खेळाची आवड जोपासत देशाला गौरवास्पद यश मिळवून दिले. या तरुणीचे नाव आहे, प्रियांका इंगळे.
प्रियांका हिला नवव्या वर्षीपासूनच खो-खो खेळाची आवड निर्माण झाली होती. तिची आवड ओळखून आई-वडिलांनी देखील तिला कायम प्रोत्साहन दिले. घरची परिस्थिती बेताची असली तरी प्रियांकाने त्याचा बाऊ न करता अभ्यास सांभाळून सातत्याने खेळाचा सराव सुरू ठेवला. त्याचेच फळ म्हणून तिची शालेय संघांनतर लवकरच जिल्हा आणि त्यानंतर राज्य संघात निवड झाली. प्रियांकाने आजवर महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना २० राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. गेल्यावर्षी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत तिला सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी दिला जाणारा ‘राणी लक्ष्मीबाई पुरस्कार’ प्राप्त झाला. त्याचप्रमाणे गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले.
याच कामगिरीची दखल घेऊन प्रियांकाची आशियायी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली. श्रीलंका, बांगलादेश, भूतान आणि नेपाळ या संघांना पराजित करत भारतीय महिला संघाने स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजवले. आक्रमक म्हणून खेळणाऱ्या प्रियांकाने प्रत्येक सामन्यात गुण मिळवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. प्रियांका ही वाणिज्य शाखेतील पदवीधारक आहे. तिचे वडील हनुमंत इंगळे यांचा स्वतःचा व्यवसाय असून आई सविता इंगळे या घरेलू कामगार आहेत. प्रियांकाला खो-खो प्रशिक्षक अविनाश करवंदे आणि शालेय क्रीडा शिक्षक संजय जैनक यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
आमच्या कुटुंबातील कोणीही कोणताच खेळ कधी खेळले नाही. मात्र, प्रियांकाला लहानपणापासूनच खो-खो खेळात रस निर्माण झाला होता. तिची आवड पाहून मी व तिच्या आईने तिला कायमच पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला. यापुढेही तिला जे करण्याची इच्छा असेल, त्याला पालक म्हणून आम्ही कायम पाठिंबाच देऊ.
- हनुमंत इंगळे (प्रियांकाचे वडील)