वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपूल

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपूल

पुणे, ता. २४ : शहरातील वाहतूक कोंडी ही सर्वांत मोठी डोकेदुखी ठरत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यावर भर देण्यात आला आहे, हे या महापालिकेच्या अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्य ठरले.
पुण्याचा वेगाने विस्तार होत आहे. त्यातून वाहतूक कोंडीत भर पडत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यात आता आणखी काही पूल या अर्थसंकल्पात प्रस्तावित केले आहेत.
विश्रांतीवाडी येथे पुणे महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग योजनेअंतर्गत संयुक्तपणे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला असून, पूर्वगणनपत्रक तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, कोरेगाव पार्क साधू वासवानी चौक ते बंडगार्डन पुलापर्यंत वाहतुकीचा एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील वाहतुकीची समस्या सुटेल. पुलाच्या पुनर्निर्माणासाठी २० कोटी रुपयांची तरतूद सूचविण्यात आली आहे.
सांगवी आणि बोपोडी यांना जोडणारा पूल पुणे आणि पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने बांधण्यात येणार आहे. त्याचा निम्मा-निम्मा खर्च दोन्ही महापालिका करणार असून, पुणे महापालिकेच्या हिश्श्याचे १८ कोटी रुपये टप्प्या-टप्प्याने देण्यात येणार आहेत. या कामासाठी अर्थसंकल्पात १५ कोटी रुपयांची तरतूद सुचविण्यात आली आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी (पीएमपी) ४५९.४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दिघी ते आळंदी, मुकाई चौक ते भक्ती-शक्ती व बोपोडी ते वाकडेवाडी असे तीन बीआरटी कॉरिडॉर्स प्रस्तावित करण्यात आले आहेत. या तिन्ही कॉरिडॉर्सची एकूण लांबी १७.५ किलोमीटर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com