
कोथरूडमध्ये घरफोडी, सव्वानऊ लाखांचा ऐवज चोरी
पुणे : सदनिकेच्या खिडकीचे लोखंडी गज तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड, असा एकूण नऊ लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. ही घटना कोथरूड डेपोजवळ मोकाटेनगरमध्ये घडली. याप्रकरणी अनंत वसंत शेंडगे (वय ४०, रा. अवधूत सोसायटी, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शेंडगे हे कुटुंबासह २२ मार्च रोजी बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी खिडकीचे गज तोडून घरातील कपाटातून आठ लाख ३२ हजारांचे सोन्याचे दागिने आणि एक लाखांची रोकड, असा एकूण नऊ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. बाहेरगावावरुन परतल्यानंतर हा प्रकार समोर आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बसवराज माळी करत आहेत.
बोपोडीत विजेच्या धक्क्याने मुलीचा मृत्यू
पुणे : घराच्या छताजवळून गेलेल्या उच्च दाबाच्या वीजवाहिनीच्या धक्क्याने एका दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी भागात पवळे चाळीत घडली. शुभ्रा ओहाळ (वय १०) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना १५ मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत शुभ्राचे वडील गणेश अरविंद ओहाळ (वय ३५, रा. बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून खडकी पोलिसांनी महेमुद्दीन मगदूम (रा. बोपोडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ओहाळ हे बोपोडीतील पवळे चाळीत मगदूम यांच्याकडे भाडेतत्त्वावर राहतात. शुभ्रा घराच्या छतावर गेल्यानंतर ती उच्च दाबाच्या वीजवाहिनीच्या संपर्कात आली. त्यावेळी विजेचा धक्का बसून तिचा मृत्यू झाला. घरमालकाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे ओहाळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
येरवड्यात सराईतांकडून वाहनांची तोडफोड
पुणे : कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगाराने कोयते हवेत फिरवत दहशत माजविली. तसेच रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केल्याची घटना येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात घडली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी सुलतान रिझवान शेख (वय २१, रा. कोंढवा) आणि साजिद शेख (वय १८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुलतान शेख हा सराईत गुन्हेगार असून, घरफोडीच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात होता.