अर्थसंकल्पाची डिजिटल प्रत अनुपलब्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्थसंकल्पाची 
डिजिटल प्रत
अनुपलब्ध
अर्थसंकल्पाची डिजिटल प्रत अनुपलब्ध

अर्थसंकल्पाची डिजिटल प्रत अनुपलब्ध

sakal_logo
By

पुणे, ता. २४ ः तब्बल साडेनऊ हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करून, माहिती तंत्रज्ञान विभागासाठी सुमारे ८० कोटी रुपयांची तरतूद करणाऱ्या महापालिकेला अर्थसंकल्पाची डिजिटल प्रत संकेतस्थळासह समाजमाध्यमांवर उपलब्ध करून देता आली नाही. विशेषतः वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत सूचना करूनही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ‘सॉफ्ट कॉपी’ देण्याची गरज वाटली नाही.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी शुक्रवारी २०२३-२४ या वर्षीचे अंदाजपत्रक सादर केले. त्यानंतर अंदाजपत्रकाममध्ये कोणत्या घटकांना किती प्राधान्य देण्यात आले आहे, कोणाला सवलती मिळाल्या आहेत, कोणते नवीन प्रकल्प, उपक्रम किंवा योजना आयुक्तांनी मांडल्या आहेत, याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी नागरिक, विविध विषयांमधील तज्ज्ञ यांच्याकडून महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहिले जात होते. दुपारी दीड वाजता आयुक्तांनी अंदाजपत्रक सादर केले, मात्र रात्री आठ वाजल्यानंतरही अंदाजपत्रकाची डिजिटल कॉपी’ उपलब्ध करून देण्यात आली नव्हती.
दरम्यान, याबाबत महापालिकेच्या जनसंपर्क विभागाकडे तक्रार करण्यात आली, त्यांनीही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली. तेव्हा, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘सॉफ्ट कॉपी’ उपलब्ध करून देण्यास असमर्थता दर्शविली. हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घालण्यात आला. त्यानंतरही या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यात आले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांना याबाबत विचारले असता, त्यांनी महापालिकेच्या अंदाजपत्रकाची डिजिटल प्रत तत्काळ उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना दिल्या जातील, असे सांगितले.