‘बीआरटी’ला वाटाण्याच्या अक्षता !

‘बीआरटी’ला वाटाण्याच्या अक्षता !

सकाळ वृत्तसेवा ः पांडुरंग सरोदे
पुणे, ता. २५ ः शहरातील साडेचार ते पाच लाख प्रवाशांची दैनंदिन वाहतूक करणाऱ्या व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा भाग असणाऱ्या बस रॅपीड ट्रान्झिस्ट (बीआरटी) प्रकल्पासाठी महापालिकेने अंदाजपत्रकात कुठलीच आर्थिक तरतूद न करता बीआरटीला वाटाण्याच्या अक्षता दिल्या. बोपोडी ते वाकडेवाडी हा नवीन मार्ग प्रस्तावित केला, मात्र बीआरटीच्या उर्वरित कामांसाठी कुठल्याही प्रकारची आर्थिक तरतूद केली नसल्याची सद्यःस्थिती आहे.
पुणे महापालिकेचे साडेनऊ हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी शुक्रवारी मांडले. त्यामध्ये पीएमपीएमएलसाठी ४६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. प्रत्यक्षात बीआरटीचा त्यामध्ये उल्लेख केला नाही. महापालिकेच्या अंदाजपत्रकात बीआरटीसाठी आर्थिक तरतूद करावी, याबाबतचे पत्र पीएमपीएमएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांच्या कार्यालयाकडून महापालिका आयुक्तांना पाठविण्यात आले होते. त्यानंतरही बीआरटीच्या वाट्याला आर्थिक तरतूद आली नाही.

बोपोडी-वाकडेवाडी नवीन बीआरटी
अंदाजपत्रकामध्ये दिघी ते आळंदी, मुकाई चौक ते भक्ती चौक आणि बोपोडी ते वाकडेवाडी या नवीन बीआरटी मार्गाचा उल्लेख केला आहे. या तीनपैकी दोन मार्ग पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येतात. तर बोपोडी ते वाकडेवाडी हा मार्ग पुणे महापालिकेच्या हद्दीत येतो. बोपोडी-वाकडेवाडी या सहा किलोमीटरच्या मार्गावर अद्याप बीआरटी नाही. तेथे बीआरटी झाल्यास पुढे पिंपरी-चिंचवड बीआरटी मार्गाला हा मार्ग जोडला जाऊन प्रवाशांची आणखी सोय होऊ शकते. मात्र त्यासाठी किती आर्थिक तरतूद असणार आहे, याचाही उल्लेख नाही.

‘बीआरटी’ समोरील समस्या
- पुणे महापालिका हद्दीत सध्या कात्रज रस्ता, आळंदी रस्ता व नगर रस्ता या तीन मार्गांवर बीआरटी कार्यरत
- या मार्गांवर २५ बसथांबे असून त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यांची देखभाल-दुरुस्ती गरजेची
- वीज, मीटर, फरशा, लेन तुटलेल्या अवस्थेत
- दुरुस्तीसाठी दरवर्षी प्रत्येक बसथांब्यासाठी १० लाख रुपये देण्याची मागणी पीएमपीने महापालिकेकडे केली होती. प्रत्यक्षात त्याचा उपयोगच झाला नाही.

पिंपरी महापालिकेकडून पुरेसा निधी
पुणे बीआरटीसाठी पुरेशी आर्थिक तरतूद नसताना दुसरीकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून बीआरटीला खंबीर आर्थिक साथ मिळत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटीचे चार कॉरिडॉर येतात. चारही मार्गांच्या देखभाल-दुरुस्तीसह अन्य संलग्न कामांची माहिती त्यांना दिल्यास महापालिका त्वरित निधी उपलब्ध करून देत कामे पूर्ण करीत असल्याचा अनुभव पीएमपी प्रशासनाला येत आहे. याउलट, पुणे महापालिकेकडून बीआरटीकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे अंदाजपत्रकातून स्पष्ट झाले आहे.

४७० कोटी रुपयांची तरतूद
महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी अंदाजपत्रक सादर केल्यानंतर पीएमपीच्या आर्थिक तरतुदीबाबत प्रश्‍न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी पीएमपीसाठी ४७० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही तरतूद कर्मचाऱ्यांचे पगार, डिझेल, सीएनजीसाठी केली आहे. आगामी वर्षभरात ती टप्प्याटप्प्याने पीएमपीला दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.


पुणे बीआरटी मार्ग


- पुणे बीआरटी कॉरिडॉर

२२ किलोमीटर
- मार्गांची एकूण लांबी

२५
- बसथांब्यांची संख्या

८००
- पुणे, पिंपरी बीआरटी मार्गावरील बस

साडेचार ते पाच लाख
- दररोज होणारी प्रवासी वाहतूक

‘बीआरटी’चे फायदे
- प्रवासाच्या वेळेत १५ ते २० मिनिटांची बचत
- अपघात व ब्रेक डाऊनची संख्या अत्यल्प
- बसमध्ये चढ-उतार करणे सोपे
- नेहमीच्या तुलनेत बीआरटी प्रवास आरामदायी
- बसच्या फेऱ्या रद्द होण्याच्या घटना नाहीत
- वाहतूक कोंडीचा फटका बसण्याची शक्‍यता नाही

तुमचे मत सांगा...
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सुरू केलेल्या ‘बीआरटी’साठी महापालिकेने अंदाजपत्रकात कुठलीच आर्थिक तरतूद केली नाही. हे कितपत योग्य आहे. याबाबत आपले मत मांडा....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com