eco-friendly manufacturing
eco-friendly manufacturingsakal

Pune News : पर्यावरणपूरक उत्पादन निर्मितीकडे लष्कराचे लक्ष

पाणी बाटलीचे नवीनतम डिझाईन पर्यावरणीय भार कमी करत असल्याचे स्पष्ट

पुणे : जागतिक पातळीवर पर्यावरण संवर्धनासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर लष्कराने संरक्षण क्षेत्रात पर्यावरणपूरक उत्पादनांच्या निर्मितीकडे लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी एक छोटा प्रयोग केला असून त्यामध्ये लष्‍कराला आवश्‍यक अशा पाण्याच्या बाटलीतील प्रकारांचा जीवनचक्र मूल्यांकनावर (एलसीए) आधारित विश्लेषण केले आहे. त्यात बाटलीचे नवीनतम डिझाईन हे सर्वात कमी पर्यावरणीय भार देत असल्याचे आढळून आले.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शाश्र्वत विकास कामांवर भर दिला जात आहे. त्याच अनुषंगाने सशस्त्र दलांसाठी उपयुक्त अशा संसाधनांची पर्यावरणपूरक पद्धतीने निर्मिती करण्यात येत आहे. यामध्ये महत्त्वाच्या संसाधनांपैकी एक अर्थात लष्कराद्वारे वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या बाटल्या.

विशेषतः सियाचीनसारख्या बर्फाळ प्रदेशात जेथे पर्यावरणीय घटक हे चिंतेची बाब ठरतात, अशा भौगोलिक भागात पर्यावरणीय ऱ्हासाच्या दृष्टिकोनातून सिमाप्रो सॉफ्टवेअरच्या आधारे बाटल्यांचे जीवनचक्र मूल्यांकन करत विश्लेषण करण्यात आले. याबाबतची माहिती नुकतीच ‘डिफेन्स सायन्स जर्नल’ या शोधपत्रिकेत प्रकाशित करण्यात आली.

त्यानुसार पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून उत्पादनात बदल करताना पहिले मिश्र धातुतील बाटली, नंतर प्लॅस्टिक आणि शेवटी पॉली कार्बोनेटमध्ये बदल करून बाटलीच्या कार्यक्षमता आणि पर्यावरणासाठी कितपत कमी धोकादायक आहे, याची चाचणी करण्यात आली.

का केला अभ्यास?
सशस्त्र दलातील जवानांच्या लढाऊ किटमध्ये पाण्याची बाटली ही त्यांच्या मोहिमांच्या अंमलबजावणीदरम्यान पुरेसे पाणी वाहून नेण्यासाठी आवश्यक वस्तू आहे. यासाठी हलक्या वजनाची, सर्व प्रतिकूल हवामानाच्या स्थितीतही पाणी खराब न होणारी आणि मजबूत स्वरूपाच्या पाण्याच्या बाटलीची आवश्‍यक असते. अशा दर्जाची बाटली जवानांकडे नसेल तर त्यांना चांगले पाणी उपलब्ध होणार नाही. दरम्यान पाणी स्वच्छ आणि शुद्ध राखण्यासाठी बाटली तयार करताना वापरले जाणारे धातू किंवा प्लॅस्टिक पर्यावरणासाठी धोक्याचे ठरते. या गोष्टींचा विचार करत पर्याय शोधण्याकरिता धातू, प्लॅस्टिक आणि पॉली कार्बोनेट या साहित्यांचा वापरातून निर्मिती केलेल्या बाटल्‍या दोन्ही उद्दिष्टांची पूर्ती करतात की नाही?, हे यात समजून घेण्यात आले.

अभ्यासातील महत्त्वाच्या बाबी...
- नवीनतम डिझाइनच्या (पॉली कार्बोनेटचा वापर) पाण्याच्या बाटल्यांचा सर्वात कमी पर्यावरणीय भार असल्याचे आढळून आले
- अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वच्छ आणि शुद्ध पाणी राखण्यास ही बाटली ८० टक्क्यांहून अधिक कार्यक्षम
- याचा पर्यावरणाला धोका कमी

यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज...
- उत्पादन सुधारणा कार्ये पर्यावरणीय स्थिरतेची काळजी न घेता उत्पादनांची कार्यक्षमता आणि वैशिष्ट्ये सुधारण्यासाठी केली जातात
- शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून उत्पादन सुधारण्याच्या कार्यांचे पुनरावलोकन करणे आवश्यक
- पारंपरिक अभियांत्रिकी रचना स्तरावर उत्पादनांच्या जीवनचक्र मूल्यांकनाचा अभ्यास गरजेचा
- पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून उत्पादनात बदल करताना ते पुनर्वापरासाठी किंवा लवकर विघटन होण्यायोग्य असेल यावर भर देणे
- संरक्षण उत्पादनांची पर्यावरणाच्यादृष्टीने जागरूक रचना गरजेची

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com