कुष्ठरुग्णांमधील कलाकौशल्य जगासमोर नेण्याची आवश्‍यकता 

डॉ. विकास आमटे यांचे आवाहन ः उर्वी संस्थेच्या ‘गावभ्रमण’ प्रदर्शनाचे उद्‌घाटन

कुष्ठरुग्णांमधील कलाकौशल्य जगासमोर नेण्याची आवश्‍यकता डॉ. विकास आमटे यांचे आवाहन ः उर्वी संस्थेच्या ‘गावभ्रमण’ प्रदर्शनाचे उद्‌घाटन

पुणे, ता. २६ ः ‘‘डॉ. बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्ण, अंध, अपंग अशा समाजाने नाकारलेल्या लोकांच्या हातांना कामे दिली. त्यावरून काही लोकांनी त्यांच्यावर टीका केली. मात्र, याच कुष्ठरुग्णांमधील कौशल्य व तंत्रज्ञानाचा वापर करून आनंदवन, हेमलकसा आणि लातूरमधील भूकंपग्रस्त किल्लारीमध्ये पर्यावरणपूरक घरेच नाही तर गावे उभारली. समाजानेच आता अशा नाकारलेल्या कुष्ठरुग्ण, अंध, अपंगांचे कलाकौशल्य जगासमोर नेण्याची गरज आहे.’’ असे आवाहन आनंदवन संस्थेचे संचालक डॉ. विकास आमटे यांनी रविवारी केले.

उर्वी संस्थेच्यावतीने बालगंधर्व कलादालन येथे भरविलेल्या ‘गाव भ्रमण’ या प्रदर्शनाचे उद्‌घाटन डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेच्या संस्थापक-संचालक व वास्तुविशारद अमृता नायडू, प्रसाद थेटे व नरेंद्र नायडू उपस्थित होते. हे प्रदर्शन २७ मार्चपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत खुले राहणार आहे.

डॉ. आमटे म्हणाले, ‘‘आपली जंगले व त्यातील आदिवासींचे जगणे आजही समृद्ध आहे. त्यांच्या गरजा मर्यादित आहेत. दंडकारण्यात आम्ही काम सुरू केले, तेव्हा तेथे एकही भिकारी दिसला नाही. बाबा आमटे यांनी तेथील कुष्ठरुग्ण, अंध, अपंग अशा लोकांच्या हातांना कामे दिली. माझ्या आईने या लोकांच्या लग्नाची कल्पना प्रत्यक्षात उतरविली. मात्र, त्यांना राहण्यायोग्य घरे असावीत, या संकल्पनेतून त्यांच्याच कलाकौशल्य, कष्टाचा आणि लाकूड, लोखंडाचा कमीत कमी वापर करून पर्यावरणपूरक घरे उभारली. भूकंपाच्यावेळी आमच्या १०० लोकांनी किल्लारीमध्ये घरे उभारून सर्वोत्कृष्ट घरांचा मान मिळविला. या घरांची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी कुष्ठरुग्ण, अंध, अपंगांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले. पु. ल. देशपांडे यांनी तर ‘एकलव्य विद्यापीठ’ विद्यापीठ अशा समर्पक आनंदवनातील कुष्ठरुग्णांच्या कार्याचा गौरव केला आहे. कुष्ठरुग्णांमधील हेच कौशल्य व तंत्रज्ञान आता जगासमोर येण्याची गरज आहे.’’

प्रदर्शनाबाबत डॉ. आमटे म्हणाले, ‘‘अमृता नायडू यांच्या तीन पिढ्यांचा आमच्या कुटुंबाशी जवळचा संबंध आहे. ग्रामीण भागामध्ये पर्यावरणपुरक घरे उभारणीमध्ये त्यांची संस्था चांगले काम करीत आहे.’’ वास्तुविशारद अमृता नायडू म्हणाल्या, ‘‘आमच्या संस्थेने डॉ. विकास आमटे व आनंदवनातूनच प्रेरणा घेतली आहे. आनंदवनातील घर उभारणीमध्ये आमच्या संस्थेचा खारीचा वाटा असल्याचा आम्हाला अभिमान आहे, याचे समाधान आहे.’’
......................
फोटो नं - ०९६८१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com