मेट्रोची धाव वाढणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रोची धाव वाढणार!
मेट्रोची धाव वाढणार!

मेट्रोची धाव वाढणार!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक ही मार्गिका प्रवाशांसाठी सुरू केल्यानंतर आता लवकरच फुगेवाडी स्थानक-सिव्हिल कोर्ट (शिवाजीनगर) इंटरचेंज स्थानक आणि गरवारे कॉलेज स्थानक-सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि रूबी हॉल स्थानक ही मार्गिका सुरू करण्यात येणार असल्याचे महामेट्रोने कळविले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर आणि वनाज ते रूबी हॉल स्थानकापर्यंत नागरिकांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे.

सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रूबी हॉल स्थानक या मार्गीकेवर मंगळवार पेठ (आरटीओ), पुणे रेल्वे स्थानक, रूबी हॉल स्थानक ही महत्त्वाची स्थानके आहेत. यामुळे आरटीओ कार्यालय, पुणे रेल्वे स्थानक, रूबी हॉल, जहाँगीर हॉस्पिटल, वाडिया कॉलेज जोडले जाणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पुण्याच्या नागरिकांना या भागात येणे-जाणे सोयीचे होणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाला मेट्रोच्या कॉनकोर्स मजल्याशी जोडण्यात आल्यामुळे रेल्वे आणि मेट्रो प्रवाशांना थेट एकमेकांच्या सेवांचा लाभ घेणे सोईचे होणार आहे. तसेच मेट्रो स्थानकावरून रेल्वेच्या सर्व फलाटांवर जाणे सहज शक्य होणार आहे.

विद्यार्थ्यांना होणार फायदा
मंगळवार पेठ स्थानक (आरटीओ) हे अत्यंत गर्दीच्या ठिकाणी आहे. आरटीओ कार्यालयात येणाऱ्या असंख्य नागरिकांना याचा फायदा होईल. तसेच या भागात इंजिनिअरिंग कॉलेज, नायडू हॉस्पिटल आणि शाळा ही महत्त्वाची ठिकाणे आहेत. या मार्गावर रोज प्रवास करणाऱ्या तीन ते चार हजार विद्यार्थ्यांना या मेट्रो स्थानकामुळे फायदा होणार आहे.

महत्त्वाचे टप्पे
- गरवारे स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक या मार्गावर गेल्या वर्षी २५ नोव्हेंबर रोजी मेट्रो रेल्वेची चाचणी रोजी घेण्यात आली होती.
- फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक मार्गावर डिसेंबर ३१ रोजी चाचणी घेण्यात आली होती.
- आता पुढील टप्प्यात सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक-मंगळवार पेठ (आरटीओ)-पुणे रेल्वे स्थानक-रूबी हॉल स्थानक या मार्गावर येत्या दोन दिवसांत चाचणी घेण्यात येणार आहे.
- या तिन्ही मार्गीकेवरील कामे जवळपास संपुष्टात आले आहे.
- उर्वरित कामे येत्या आठ ते दहा दिवसांत पूर्ण झाल्यावर या मार्गीकांचे ‘सीएमआरएस’ निरीक्षण करण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांना बोलावण्यात येणार आहे.
- त्याची मान्यता मिळाल्यानंतर प्रवासी सेवा या मार्गावर सुरू करण्यात येणार आहे.

फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि गरवारे कॉलेज स्थानक ते रूबी हॉल स्थानक या मार्गिकांची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. या मार्गावर लवकरच प्रवासी सेवा सुरू करण्यात येणार आहे.
- डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो
--