
आयआयटीएमद्वारे ओझोन परिस्थितीचा अभ्यास
पुणे, ता. ३ : हवेची गुणवत्ता सुधारणे, आणि हवामान बदलाचे अचूक अंदाज देऊन नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी धोरण निश्चिती करणे या उद्देशाने देशात पहिल्यांदाच ओझोन थराचा अभ्यास करण्यात आला आहे. येथील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम), आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑबझर्व्हेशनल सायन्सेस आणि युरोपियन नेशनच्या सहकार्याने ‘स्ट्रॅटोक्लिम प्रकल्पा’ अंतर्गत हा अभ्यास केला आहे. या अभ्यासातून देशातील धोरण निश्चितीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुढाकाराने ऑगस्ट २०१६ मध्ये झाला असून नुकताच हा अभ्यास प्रकाशित केला आहे. जमिनीपासून ३२ किलोमीटर उंचावर हवामानशास्त्रीय मोजमाप करणाऱ्या विशिष्ट फुगा सोडण्यात आला. त्याद्वारे ओझोन, पाणी आणि हवेतील एरोसोल या घटकांचा अभ्यास करण्यात आला. सूर्यप्रकाशादरम्यान नायट्रोजन ऑक्साईड्स, नॉन-मिथेन वाष्पशील सेंद्रिय संयुगे, मिथेन, कार्बन मोनोऑक्साइड सारख्या रसायनांमुळे वातावरणात ओझोनची निर्मिती होते. ओझोन थराचा, त्याच्या रासायनिक घटकांचा अशा प्रकारचा अभ्यास प्रथम झाला असून यासाठी नैनीताल सारख्या उंच ठिकाणची निवड केली होती.
याबाबत आयआयटीएमच्या शास्त्रज्ञ डॉ. सुवर्णा फडणवीस म्हणाल्या, ‘‘ओझोन हा हवा प्रदूषक आणि महत्त्वाचा हरितगृह वायू आहे. ओझोनचे अचूक मॉडेल सिम्युलेशन हवेच्या गुणवत्तेचा आणि हवामान बदलाचा अंदाज लावण्यासाठी महत्त्वाचे आहे. आतापर्यंत ओझोनच्या थराबाबत झालेल्या अभ्यासात रासायनिक घटके आणि पाण्याचे अंश विविध प्रारूपातून दिसून आले असून ते अपुरे ठरत आहेत. यामुळे हवेच्या गुणवत्तेचा तसेच हवामानाचा अंदाज काढताना काहीशा त्रुटी देखील आढळत होत्या. त्यामुळे अधिकाधिक अचूक माहिती व अंदाज मिळविण्यासाठी हा अभ्यास केला आहे.
या अभ्यासाचा भविष्यात समाज व धोरणांच्या निर्मितीत तसेच संशोधनाच्या अनुषंगाने फायदा होईल. या मॉडेल सिम्युलेशनमध्ये रसायनशास्त्र सुधारल्याने अचूक हवेची गुणवत्ता आणि हवामान अंदाज काढणे शक्य होईल. जे समाज, मानवी आरोग्य आणि धोरण निर्मात्यांसाठी अत्यंत गरजेचे आहे. या अभ्यासातून असेही स्पष्ट होत आहे की, मॉडेल हवामानाचा अंदाज सुधारण्यासाठी ओझोनच्या थरातील सर्व रासायनिक घटकांचे निरीक्षणासाठीच्या प्रारूपांमध्ये सुधारणा गरजेचे आहे.
- डॉ. सुवर्णा फडणवीस, शास्त्रज्ञ-आयआयटीएम