
यकृत आणि मूत्रपिंडाचे यशस्वीरित्या प्रत्यारोपण
यकृत, मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या
शस्त्रक्रिया ‘सह्याद्री‘त यशस्वी
पुणे, ता. २ ः यकृताचा दाह विकाराने (लिव्हर सिरॉसिस) त्रस्त असलेल्या आणि गेल्या पाच वर्षांपासून डायलिसीस घेणाऱ्या ५७ वर्षीय रुग्णांचे यकृत व मूत्रपिंड प्रत्यारोपण करत त्यांना जीवनदान देण्यात डॉक्टरांना यश आले आहे. सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पार पडल्या. प्रत्यारोपणासाठी ‘सबड्युलर हिमॅटोमा‘मुळे ‘ब्रेन डेड’ झालेला एक ४९ वर्षीय रुग्ण अवयवदाता होता. त्याच्या एक मूत्रपिंड आणि यकृताचे प्रत्यारोपण करण्यात आले, तर दुसरे मूत्रपिंड शहरातील दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले. ही शस्त्रक्रिया यकृत आणि बहु-अवयव प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. बिपिन विभूते आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. अतुल सजगुरे यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ वैद्यकीय पथकांनी केल्या. यकृताच्या मुख्य रक्तवाहिनीतील एक स्टेंट थेट हृदयापर्यंत पोहोचल्याने शस्त्रक्रिया आव्हानात्मक ठरली. दहा तासांच्या शस्त्रक्रियेत हे आव्हान यशस्वीपणे पेलण्यात आले. पथकात डॉ. शीतल महाजनी, डॉ. अपूर्वा देशपांडे, डॉ. अनिरुद्ध भोसले, डॉ. अभिजित माने, डॉ. केतन पै, डॉ. संजय कोलते, प्रत्यारोपण भूलतज्ज्ञ डॉ. मनीष पाठक, डॉ. मनोज राऊत आणि डॉ. बालाजी मोमाले यांचाही समावेश होता.
-----