‘बालकल्याण’च्या विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर यश

‘बालकल्याण’च्या विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर यश

पुणे, ता. २६ ः दिव्यांगासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘ऍबिलिम्पिक’ या कला प्रकारातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुण्यातील बालकल्याण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले. फ्रान्स येथे झालेल्या या स्पर्धेत संस्थेचे चेतन पाशीलकर, प्रियांका दबडे, ओंकार देवरूखकर आणि भाग्यश्री नाडीमेटला हे चार विद्यार्थी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, यातील चेतन व प्रियांका यांनी आपापल्या कला प्रकारांमध्ये अनुक्रमे सुवर्ण व रजत पदकांचीही कमाई केली.

या स्पर्धेचे हे दहावे वर्ष होते. यंदा या स्पर्धेत सुमारे २७ देशांनी ४१ कला प्रकारांमध्ये सहभाग घेतला होता. भारतातर्फे यात १३ दिव्यांग सहभागी झाले होते. त्यामध्ये बालकल्याण संस्थेच्या चार विद्यार्थ्यांचा सहभाग होता. चेतन पाशीलकर याने चित्रकला व कचरा पुनर्वापर या प्रकारात, प्रियांका हिने एम्ब्रॉयडरी, ओंकार याने पोस्टर डिझाईनिंग आणि भाग्यश्री हिने ड्रेस मेकिंग या प्रकारांत भाग घेतला होता. चेतन याने प्रथम क्रमांक पटकावीत सुवर्णपदक आणि प्रियांका हिने द्वितीय क्रमांक पटकावीत रजतपदक आणि एक्सलन्स पुरस्कार पटकावला, अशी माहिती संस्थेच्या व्यवस्थापिका अपर्णा पानसे यांनी दिली.
या स्पर्धेसाठी वेगवेगळ्या निवड फेरी पूर्ण करून त्यानंतर या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड करण्यात आली. त्यानंतर ‘नॅशनल ऍबिलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडिया’तर्फे या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीच्या दृष्टीने वेळोवेळी मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी हे विद्यार्थी मुंबई व दिल्ली येथे प्रशिक्षणासाठी जात होते. या विद्यार्थ्यांना बालकल्याण संस्थेच्या सुलभा बारवकर व विशाल यादव यांचेही मार्गदर्शन मिळत होते.

विद्यार्थ्यांचे स्पर्धेव्यतिरिक्तही यश
चेतन पाशीलकर याने फाईन आर्ट्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्याला आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्याच्या चित्रांची विक्रीही झाली आहे. प्रियांका दबडे हिने फॅशन डिझायनिंगमध्ये डिप्लोमा केला असून तिने विविध प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. राज्यपालांच्या हस्ते तिचा सत्कार झाला आहे. ओंकार देवरूखकर याने अभिनव कला महाविद्यालयातून व्यावसायिक कलाकार ही पदवी प्राप्त केली आहे. ‘देसाई बंधू’मध्ये तो डिझाइनर आर्टिस्ट म्हणून काम करत आहे. भाग्यश्री नाडीमेटला हिने आर्ट मास्टर ही पदवी प्राप्त केली असून कर्णबधिर मुलांच्या शाळेत कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहे. ती स्वतःच्या वस्तूंचे प्रदर्शनही भरवते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com