
पुणे शहर परिसरात पावसाची शक्यता
पुणे, ता. २ ः पुणे शहरात चाळीशीवर पोचलेल्या कमाल तापमानाचा पारा आता पुन्हा झपाट्याने खाली घसरून ३६.५ अंश सेल्सिअस वर आला आहे. यातच पावसासाठी पोषक स्थिती असून पुढील तीन दिवस पुणे शहर आणि परिसरात दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून शहरात हजेरी देणाऱ्या पूर्वमोसमी पावसाने शुक्रवारी (ता. २) काहीशी विश्रांती घेतली होती. दरम्यान असे असले तरी उन्हाच्या झळा मात्र तीव्रपणे जाणवत आहे. शुक्रवारी शहरात ३६.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर सरासरीच्या तुलनेत मात्र कमाल तापमानात गुरुवारच्या (ता. १) तुलनेत घट झाली होती. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पारा घाली घसरला होता. मात्र, उन्हाचा ताप कायम असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस म्हणजेच सोमवारपर्यंत (ता. ५) पुणे व परिसरात दिवसा निरभ्र वातावरण तर दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. दरम्यान कमाल तापमानातील चढ-उतार कायम राहू शकते.