
शरीरसौष्ठवासाठी बेकायदा इंजेक्शनची विक्री करणाऱ्याला अटक
पुणे, ता. ३ : शरीरसौष्ठवासाठी बेकायदा इंजेक्शनची विक्री करणाऱ्या एका औषध विक्रेत्याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. कोंढवा परिसरात ही कारवाई करण्यात आली. मंगेश पोपट नरुटे (वय ३३, रा. नऱ्हे, आंबेगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरुटे याचे कोंढवा परिसरातील उंड्री येथे संगम मेडिकल ॲण्ड लॅब हे औषध विक्री दुकान आहे. नरुटे शरीरसौष्ठवासाठी बेकायदा इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून पोलिस आणि अन्न, औषध विभागाच्या (एफडीए) पथकाने या प्रकाराची शहानिशा केली. त्यानंतर नरुटे यांच्या औषध विक्री दुकानावर छापा टाकून मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या आठ बाटल्या तसेच गर्भपाताच्या गोळ्यांची सात पाकिटे जप्त करण्यात आली.