‘ई लर्निंग’मुळे विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ई लर्निंग’मुळे विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी
‘ई लर्निंग’मुळे विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी

‘ई लर्निंग’मुळे विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी

sakal_logo
By

पांडुरंग सरोदे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३ : महापालिकेच्या शाळा एकीकडे कात टाकत असतानाच, दुसरीकडे शाळांमधील ‘ई-लर्निंग’ अभ्यासाचा विद्यार्थ्यांना चांगलाच फायदा होऊ लागला आहे. मागील सुमारे दहा वर्षांपासून महापालिकेच्या शाळांमधील शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 50 च्या पुढे जात नव्हती. यंदा मात्र ‘ई-लर्निंग’ व अन्य काही कारणांमुळे 110 विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत आले, त्याचबरोबर शाळांचा निकालही वाढला आहे. ‘ई - लर्निंग’ शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ गुणात्मकच नव्हे, तर व्यक्तिमत्त्व विकासामध्येही चांगलीच सुधारणा होत असल्याचे समाधानकारक चित्र पुढे आले आहे.

महापालिका प्रशासनाकडून मागील काही वर्षांपासून पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. विशेषतः महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे आर्थिक व दुर्बल घटकातील मुलेही स्पर्धेमध्ये टिकून राहावेत, यासाठी विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेला अधिक वाव देण्यासाठी प्रयत्न केला जात आहेत. त्यादृष्टीने महापालिकेच्या शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये ऑगस्ट 2019 मध्ये ‘ई-लर्निंग’ शिक्षण देण्यास सुरुवात केली. कोरोना कालावधीनंतर मागील वर्षीपासून शाळा पुर्ववत सुरु झाल्या. त्यानंतर शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष देण्यात आले. त्याचा विद्यार्थ्यांमध्ये चांगला परिणाम होत असल्याचे दिसून आले. यंदा पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत ११० विद्यार्थी झळकले असून निकालातही वाढ झाली आहे.

कोरोनाकाळ पथ्यावर...
महापालिकेच्या शाळांमध्ये ई लर्निंग सुरु झाले, मात्र त्याचवेळी कोरोना सुरु झाला. त्यामुळे हा प्रकल्प बंद पडण्याची शक्‍यता व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात महापालिका शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक व अधिकाऱ्यांनी याच संधीचे सोने करत विद्यार्थ्यांमध्ये ‘ई - लर्निंग’ रुजविण्यास सुरुवात केली. साध्या सोप्या पद्धतीने व दृकश्राव्य माध्यमांमुळे विद्यार्थ्यांनी दैनंदिन शिक्षणामध्ये अधिक रस घेण्यास सुरुवात केली. संबंधित ‘एज्युमित्र’ ॲप विद्यार्थी, पालकांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून शिक्षण देण्यापासून ते ऑनलाइन माध्यमे, झुमद्वारे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण केली.

अन्य उपक्रम फायदेशीर
महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा 275 शाळांमध्ये ई लर्निंग व्यवस्था आहे. शाळेच्या एका इमारतीमध्ये डिजिटल रूम असून त्यामध्ये सहा संगणक आहेत. पहिली ते दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम, बालभारतीच्या पुस्तकांचे ॲनिमेशनद्वारे मुलांना शिक्षण दिले जाते. ‘व्हिसी रुम’द्वारे विविध अभ्यासक, तज्ज्ञ, अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांना ई लर्निंग शिक्षणाद्वारे सक्षम बनवितानाच शाळांमधील शिक्षकांकडून वर्षभर परिक्षा, रंगीत तालीम घेण्याकडेही अधिक लक्ष देण्यात आले.

दृष्टिक्षेपात
महापालिकेच्या शाळांच्या इमारती - 150
महापालिकेच्या एकूण शाळा - 275
विद्यार्थ्यांची संख्या - 93 हजार
माध्यमिक शाळा - 46
माध्यमिकमधील विद्यार्थी संख्या - 18 हजार
शाळांची माध्यमे - मराठी, ऊर्दू, इंग्रजी, कन्नड

झालेला फायदा
- दृकश्राव्य पद्धतीमुळे अवघड संकल्पना सहज समजू लागल्या
- मागील वर्गातील संकल्पना पुन्हा पाहून अभ्यास करणे शक्‍य
- चित्र, रंगसंगती व ध्वनी यामुळे मुलांची अभ्यासातील रुची वाढली
- मुलांमध्ये अभ्यासाविषयी उत्सुकता निर्माण होण्यास मदत
- वाचन, अभ्यास, विविध प्रकारचे खेळ खेळण्याकडे कल वाढला

महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये ‘ई लर्निंग’ व्यवस्था आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच निकालाचे प्रमाणही वाढले. महापालिकेच्या शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याकडूनही मुलांना चांगले मार्गदर्शन केले जात आहे.

मीनाक्षी राऊत, शिक्षणाधिकारी, पुणे महापालिका.