चला...जपुया जैवविविधता!

चला...जपुया जैवविविधता!

पुणे, ता. ३ ः तब्बल ३३ लाखांहून अधिक वृक्षसंपदा, १८ टेकड्यांनी वेढलेले शहर, मुबलक पाणी, शुद्ध हवा आणि पुरेसा सूर्यप्रकाश असलेले शहर जैवविविधतेने समृद्ध झाले आहे. मात्र, अवाजवी मानवी हस्तक्षेपामुळे ही विविधता धोक्यात येत आहे. त्याचा विपरीत परिणाम पक्षी, किटक, सरपटणारे प्राणी तसेच वनस्पतींवर होत आहे. त्यामुळे त्यांचे संवर्धन करण्यासाठी महापालिका, वनविभागाबरोबरच पुणेकरांनीही जागरूक होण्याची गरज आहे. तरच शहरातील जैवविविधता बहरणार आहे.
पुण्यातील या जैवविविधतेच्या संवर्धनासाठी आवश्‍यक त्या उपाययोजनांबाबत जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने तज्ज्ञांशी संवाद साधण्यात आला. त्यात किटकांच्या संवर्धनाबाबत विशेषतः मधमाशा आणि काजव्यांच्या संवर्धनाबाबत कीटकशास्त्रज्ञ नूतन कर्णिक सांगतात, ‘‘असंख्य फुलांमधून शांतपणे मध गोळा करणाऱ्या सुंदर मधमाशा बघणे हा किती छान अनुभव असतो. मधमाशांच्या ‘एपिस’ या वर्गामधील चार मुख्य प्रजाती भारतभर आणि पुणे परिसरामध्येही दिसतात आणि या पिकांच्या परागीभवनामध्ये मोलाची मदत करतात. परंतु पिकांवर कीटकनाशकांचा होणारा वापर, प्रदूषण, एकपीक पद्धती व नष्ट होत असलेले अधिवास यामुळे मधमाशांची संख्या वेगाने कमी होत आहे.’’

मधमाशी
मधमाशीपासून मिळणाऱ्या परागकण, डिंक, मेण, विष, रॉयल जेली असे अनेक पदार्थांचा अन्न आणि औषध निर्मिती क्षेत्रात वापर होतो. शहर व परिसरातील ग्रामीण भागात मधमाशांच्या किती जाती आहेत आणि त्यांची किती संख्या आहे याचा अभ्यास करणे व त्यांच्या संवर्धनाची अत्यंत गरज आहे. मधमाशा शहरातील उंच इमारतींमध्ये पोळी बांधतात त्याचे कारण म्हणजे वृक्षतोड. पण लोकांच्या मनात मधमाशीबद्दल असलेली भीती यामुळे मधमाशांच्या पोळ्यांचा मोठ्या प्रमाणावर नाश होतो. मधमाशांचे हल्ल्यांपासून स्‍वतःचा बचाव करण्यासाठी व त्यांच्या संवर्धनाबाबत लोकांचे मार्गदर्शन केले तर, बरीच पोळी वाचतील. घराजवळ एखादे पोळं असेल तर त्यावर कीटकनाशक फवारण्याऐवजी ते तज्ज्ञांच्या मदतीने दुसऱ्या ठिकाणी हलवता येते. शेतकरी आणि नागरिक यांनी मधमाशी पालन आणि त्यांच्या संवर्धनाच्या पद्धती शिकून घेतल्या, कीटकनाशकांचा वापर कमी केला तर मधमाशांची संख्या पूर्वपदावर यायला वेळ लागणार नाही.

फोटो ः 47287

काजवे
मधमाशांप्रमाणेच काजव्यांचे अस्तित्व ही धोक्यात आले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला पुण्याच्या आसपासच्या जंगलांमधून रात्री लुकलुकणारे काजवे दिसायला सुरुवात होते. जगभरात काजव्यांच्या २० हजार प्रजाती आहेत आणि प्रत्येक प्रजातीची प्रकाश टाकायची पद्धतही वेगळी आहे. अन्नसाखळीमधला एक महत्त्वाचा घटक आहेत. काजव्यांच्या प्रकाश तयार करण्याच्या क्षमतेवर संशोधन सुरू असून याचा भविष्यात नक्कीच फायदा होणार. काजव्यांना प्रकाश टाकण्यासाठी आजूबाजूला अंधार लागतो, पण पर्यटनामुळे रात्रीचे उशिरापर्यंत चालू असणारे प्रखर दिवे त्यांच्या प्रकाश टाकण्याच्या क्रियेत अडथळा निर्माण करतात. पुण्याच्या आसपासच्या जंगलांमध्ये दरवर्षी काजवे महोत्सव आयोजित केले जातात, ज्यात नागरिक नकळतपणे टॉर्च लावून किंवा काजव्यांच्या अधिवासात जाऊन त्यांच्या पुनरुत्पादनामध्ये अडथळा निर्माण करतात. अधिवासांचा नाश आणि कीटकनाशके ही सुद्धा त्यांची संख्या कमी व्हायला कारणीभूत आहेत. काजव्यांच्या संवर्धनासाठी तेथील रहिवासी आणि पर्यटकांना काजव्यांचा अधिवास जपण्यासाठी तसेच कृत्रिम प्रकाशाचा वापर कमीत कमी करण्याबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे.


चतुर व टाचणी कीटकाबाबत डॉ. पंकज कोपर्डे सांगतात...
गोम्फिडी कुळातला हा चतुर भारतात प्रदेशाधिष्ट आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचरच्या (आययूसीएन) वर्गवारीप्रमाणे धोक्यात आलेल्या प्रजातींपैकी एक ही प्रजाती आहे. दिसायला अतिशय मनमोहक हा नदीकाठच्या वनांमध्ये आढळतो. पुण्यात पानशेत धरण भागात या प्रजातीची १०० वर्षांपूर्वीची नोंद आहे.
त्यानंतर २०१९-२० च्या दरम्यान आम्ही पुणे परिसरात याच्या नोंदी घेतल्या आहेत. नदीकाठचा अधिवास नष्ट झाल्यास हा दुर्मिळ चतुर लोप पावू शकतो. स्वच्छ नदीकाठच्या भागांत आढळणारी ही टाचणी जरी दुर्मिळ नसली तरी पर्यावरणाची उत्तम स्थिती दर्शविणारी म्हणून पाहिली जाते. आमच्या अभ्यासात ही टाचणी मुळा नदीमध्ये मुळशी सारख्या स्वच्छ पाण्याच्या ठिकाणी दिसून आली, पण प्रदूषण झालेल्या ठिकाणी नाही. अशा सुंदर प्रजातींना वाचवायचे असेल तर सर्वप्रथम जल प्रदूषण थांबवणे गरजेचे आहे.

फोटो ः 47284, 47285

पक्षी अभ्यासक महेश घाणेकर सांगतात...
रुंद शेपटीचा गवती वटवट्या उंचावरच्या गवती क्षेत्रांवर मिळतो. याचा स्वभाव लपण्याचा आहे आणि त्यांना आययूसीएनने धोक्याच्या यादीत ठेवले आहे. अर्थात जर त्यांची प्रजनन, संवर्धनाचे प्रयत्न केले नाही तर, त्यांची संख्या कमी होईल व विलुप्त होऊ शकतात. हा पक्षी फक्त पश्चिमघाट भागात आढळतो. तसेच सामान्यतः जून ते ऑक्टोबरच्या कालावधीत पुणे व आसपासच्या पर्वत रांगावर आणि किल्ल्यांवर प्रजननासाठी येतात. त्यांचे घरटं जमिनीवर गवतात असते. त्यामुळे यांच्या अधिवासाला अधिक धोका असतो. संरक्षणासाठी त्यांची घरट्याची पावसाळ्यामध्ये स्थाने निश्चित करून वन विभागाला याची माहिती देत या जागा संरक्षित करून तिथे माणूस आणि प्राण्यांचा वावर होणार नाही याची काळजी घेणे. तसेच त्यांच्या प्रवासाचा मार्ग आणि संवर्धनासाठी जीपीएस टॅगचा वापर करून अभ्यास करणे गरजेचे आहे.
फोटो ः ४७२८३


‘कारा’ शेवाळ ः
पाषाण तलावात १९३५ साली ‘कारा’ हे शेवाळ आढळून आले होते. विल्सन महाविद्यालयाचे शेवाळतज्ञ प्रा. डॉ. एस. सी. दीक्षित यांनी ''करोफाइट ऑफ बॉम्बें प्रेसिडेन्सी'' या विषयाचा अभ्यास करताना या शेवाळाचा शोध लावला होता. हे शेवाळ पुणे आणि परिसरात आढळत असल्याने व त्याच्या प्रदेशनिष्ठतेमुळे या नवीन प्रजातीचे नामकरण ‘कारा पाषाणी एस. सी. दिक्षीत’ असे करण्यात आले. हे शेवाळ पाणथळ जागी पावसाळ्यात आढळते. सध्या पाणथळ जागा कमी झाल्यामुळे या शेवाळाचे अस्तित्व ही धोक्यात आल्याचे औरंगाबाद येथील शासकीय विज्ञान संस्थेचे डॉ. अभय साळवे यांनी सांगितले.
फोटो ः 47286

रात्रीचे निसर्ग पर्यटन थांबणे गरजेचे ः
राज्यातील तसेच पुण्याच्‍या आजूबाजूला गवताळ परिसरात रात्रीचे पर्यटन चालू आहे. अशा प्रकारचे पर्यटन वाढल्याचे सध्या दिसून येत आहे. रातवा, चंडोल, पाखुर्डी, वेगवेगळ्या जातींची घुबडं, लांडगा, ससे, विंचू, गेकोज असे प्राणी दाखवायला रात्री प्रकाश टाकत लोक पर्यटन करीत आहेत. रात्री वावरणाऱ्या प्राण्यांना व पक्ष्यांना टॉर्च व प्रखर गाड्याच्या दिव्यांचा त्रास होतो. यावर आळा घालणे व अशा टूर ऑपरेटर्सवर वन विभागामार्फत कारवाई करणे गरजेचे आहे. असे महाराष्ट्र वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य अनुज खरे यांनी सांगितले.


जैवविविधतेने समृद्ध
- पाषाण तलाव
- मुळा मुठा
- बंडगार्डन
- वेताळ टेकडी
- सिंहगड
- तळजाई व पुण्याच्या परिसरातील इतर टेकड्या
- वेताळ टेकडीची खान
- शहरातील महाविद्यालये (फर्ग्‍युसन, गोखले)
- सलीम अली पक्षी अभयारण्य आदी


हे करणे गरजेचे
- शहरातील विविध टेकड्यांचे संवर्धन
- कृषी क्षेत्रात किटनाशकांची फवारणी टाळत पर्यावरणपूरक पर्यायांची निवड
- पक्षी, प्राणी, किटकांच्या अधिवासाबाबत व त्यांचा स्वभाव, वर्तनाबाबत मार्गदर्शन करणे
- जैवविविधतेच्या संवर्धनासाठी लोकसहभाग महत्त्वाचे
- वन विभाग, प्रशासनाने लोकसहभागासाठी विविध उपक्रम व योजना राबवावी
- रात्रीच्या पर्यटनावर निर्बंध
- शहरातील वृक्षराजी वाढविण्यावर भर देत, शाश्र्वत प्रकल्पांचे नियोजन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com