Loksabha Election: पुणे पोटनिवडणुकीवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत वादाची शक्यता; काँग्रेस जागेवर ठाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Loksabha Election: पुणे पोटनिवडणुकीवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत वादाची शक्यता; काँग्रेस जागेवर ठाम
पुण्याच्या जागेवर तडजोड अशक्य

Loksabha Election: पुणे पोटनिवडणुकीवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत वादाची शक्यता; काँग्रेस जागेवर ठाम

sakal_logo
By

पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा सलग दोन वेळा पराभव झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावर आपला दावा करण्यास सुरवात केली आहे. त्याचे पडसाद आज काँग्रेसच्या मुंबईतील बैठकीत उमटले.

या मतदारसंघात राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसचीच ताकद जास्त आहे. त्यामुळे मतदारसंघ सोडण्यावर तडजोड होऊच शकत नाही, अशी भूमिका शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी घेतली.

त्यावर पक्षाच्या नेत्यांनी ‘राष्ट्रवादीच्या मागणीकडे लक्ष न देता आपली संघटन बांधणी मजबूत करा. महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपचा पराभव नक्की आहे,’ अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या.


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईमध्ये प्रदेश काँग्रेसतर्फे राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसीय बैठक आयोजित केली होती. आज पुणे लोकसभा मतदारसंघावर चर्चा करण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह संग्राम थोपटे, विश्‍वजित कदम, मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, रमेश बागवे, कलम व्यवहारे, गोपाळ तिवारी, अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.


पदाधिकाऱ्यांनी पुणे लोकसभेविषयी काँग्रेस पक्षाच्या ताकदीची मांडणी केली. कदम यांनीही तशी बैठकीत ठाम भूमिका मांडली. सर्वांच्या भावांना ऐकून घेतल्यानंतर पटोले यांनी ‘‘आपण हा मतदारसंघ सोडणार नाही.

तेथे काँग्रेसचाच उमेदवार निवडणूक लढवणार आहे. पक्ष संघटना मजबूत करून सर्वांनी समन्वयाने काम करावे, पक्ष देईल तो उमेदवार निवडू आणा’’ अशी सूचना पदाधिकाऱ्यांना केली.

मनातील खदखद केली व्यक्त


बैठकीत काँग्रेसमधील गटबाजीवर चर्चा करताना पदाधिकाऱ्यांनी मनातील खदखद व्यक्त केली. पुणे कँटोन्‍मेंट हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण आता आपल्याला तिथे का मताधिक्य मिळत नाही. सुरेश कलमाडी यांच्यानंतर तेच तेच चेहरे शहराचे नेतृत्व करत आहेत, तरुणांना संधी का मिळत नाही.

महापालिकेसाठीही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे. पक्षाकडून आदेश आल्यानंतर एकदा आंदोलन केले जाते, पण त्यात सातत्य का नसते? असे प्रश्‍न उपस्थित करत शहराचे नेते म्हणवून घेणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे, असे काही पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सुनावले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गोपाळ तिवारी यांना उमेदवारी द्या


लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार कोण असणार? यावर चर्चा सुरू असताना राजीव गांधी स्मारक समितीतर्फे काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे पत्र काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांना इमेल करण्यात आले आहे. या पत्रावर पुण्यातील विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिकांची स्वाक्षरी आहे.

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा अनेक वर्षांनंतर विजय झाला, त्यात गोपाळ तिवारी यांनी प्रभाग क्रमांक १५ मधून (सदाशिव पेठ, नारायण पेठ) भाजपचे मताधिक्य कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. काँग्रेसमधील अनुभवी व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यास उमेदवारी द्यावी, अशी मागणी या पत्रातून केली आहे.