विद्यापीठीय शिक्षणासारखी ‘आरएसएस’ची शिकवण

विद्यापीठीय शिक्षणासारखी ‘आरएसएस’ची शिकवण

पुणे, ता. ३ ः व्यवस्थापनशास्त्र शिकविणाऱ्या विद्यापीठांसारखेच प्रशिक्षण राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये (आरएसएस) स्वयंसेवकांना दिले जाते. त्यामुळे ‘आरएसएस’ची शिकवण ही एखाद्या विद्यापीठासारखीच आहे, असे मत ‘सिंबायोसिस’च्या प्र-कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर यांनी शनिवारी (ता. ३) बोलताना व्यक्त केले. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रथम वर्ष संघ प्रशिक्षण वर्गाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

डॉ. येरवडेकर पुढे म्हणाल्या, ‘‘संघाच्या कार्यक्रमात मी आज पहिल्यांदाच आले आहे. या स्वयंसेवकांची शिस्त पाहून मी प्रभावित झाले आहे. सर्व शिक्षण संस्थांमध्ये वर्गात दिले जाणारे शिक्षण एकसारखेच असते. मात्र, वर्गाबाहेर मिळणारे शिक्षण जास्त महत्त्वाचे असते. संघात चारित्र्य निर्माण व राष्ट्रबांधणी यावर भर देण्यात येतो, असे मला वाटते. येथे दिले जाणारे शिक्षण हे विद्यार्थ्यांपर्यंत मर्यादित न राहता संपूर्ण समाजात जाईल.’’ या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य सुहास हिरेमठ, संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, प्रथम वर्ष संघ प्रशिक्षण वर्गाचे वर्गाधिकारी सुनील राऊत आदी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

सामूहिकता या गुणावर संघाने भर दिला आहे. अशा कार्यक्रमांतून या गुणाचे प्रदर्शन होते. आपल्या देशात नैमित्तिक देशभक्ती दिसते. मात्र, आपल्याला निरंतर व जागृत देशभक्तीची गरज असल्याचे मत सुहास हिरेमठ यांनी या वेळी व्यक्त केले.

या वेळी संघ स्वयंसेवकांनी घोष प्रात्यक्षिक, सामूहिक समता, नियुद्ध (कराटे), योगासने, दंडक्रमिका व दंडपदविन्यास आदी प्रात्यक्षिके सादर केली. या वेळी मिलिंद शेटे यांनी संकलित केलेल्या ‘हिंदू स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रशिक्षण वर्ग कार्यवाह संजय भागवत यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यामध्ये सात जिल्ह्यांतील ३१० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com