
नवीन टर्मिनसमध्ये ऑगस्टपासून चाचणी
पुणे, ता. ५ ः पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले. सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम जुलै महिन्यापर्यंत संपणार आहे. ऑगस्ट महिन्यापासून या टर्मिनलमध्ये सुविधांच्या चाचणीला सुरवात होणार आहे. तर सप्टेंबरमध्ये या नव्या वास्तूचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
पुण्याहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी विमानतळ प्रशासन प्रयत्न करीत आहे. सध्याच्या टर्मिनलमध्ये प्रवाशांना ज्या सुविधा मिळत नाहीत त्या सुविधा नव्या टर्मिनल इमारतीत मिळणार आहे. त्यामुळे पुण्याहून प्रवास करणाऱ्या व पुण्यात दाखल होणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचा चांगला अनुभव मिळणार आहे. यात पहिल्यांदाच प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रणासाठी आता सेन्सरचा उपयोग केला जाणार आहे. पुणे विमानतळावर ‘पीएफएमएस’चा (पॅसेंजर फ्लो मॅनेजमेंट सिस्टिम) वापर होईल. यासह बॅगेजच्या कटकटीपासून सुटका होण्यासाठी देखील ‘इन लाइव्ह बॅग्ज’ या प्रणालीचा वापर होणार आहे. यासह अन्य सुविधा उपलब्ध होत असल्याने प्रवाशांना चांगला अनुभव तर मिळेल शिवाय त्यांचा चेक इनमध्ये वाया जाणारा वेळ देखील वाचणार आहे.
तीन पुलांच्या साह्याने टर्मिनल जोडणार
पुणे विमानतळाच्या सध्या प्रचलित असलेल्या टर्मिनलला नव्या टर्मिनलला जोडण्यासाठी तीन स्तरांवर पूल (ब्रिज) बांधले जात आहे. त्याच्या कामाला सुरवात देखील झाली आहे. तळमजला, पहिल्या मजल्यावर एअर साइड कॉरिडॉर व सेक्युरिटी होल्ड असे दोन स्तरांवर ब्रिज बांधले जाणार आहे. अशा प्रकारे तीन पुलाच्या माध्यमातून दोन्ही टर्मिनलला जोडले जात असल्याने प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणे जाणे सोपे होणार आहे. सुमारे ११ मीटर या पुलाची लांबी आहे.
कसे आहे नवे टर्मिनल?
क्षेत्रफळ : सुमारे ६० हजार चौरस फूट
प्रवासी क्षमता : वर्षाला एक कोटी २० लाख
एरोब्रिज : पाच
एकूण खर्च : ५२५ कोटी
काय मिळणार सुविधा?
१. चेक इन काउंटरजवळ प्रवाशांची गर्दी क्षमतेपेक्षा जास्त झाली तर तिथे बसविलेल्या सेन्सरमुळे याची तत्काळ माहिती वरिष्ठापर्यंत पोचेल. त्यामुळे प्रवाशांनी तक्रार करण्याची अथवा कोणी रिपोर्ट करण्याची गरज नाही. तत्काळ त्यावर अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे.
२. प्रवाशांच्या बॅगेज चेक करण्यात आता बराच वेळ जातो. त्यासाठी दुसरी रांग करून त्यात थांबावे लागते. नव्या इन लाइव्ह बॅग्ज प्रणालीमुळे प्रवाशांना केवळ बॅगसाठी वेगळी रांग लावावी लागणार नाही. या प्रणालीमुळे एक्स रे मशिनमधून बॅगेज बेल्टवर नेण्यासाठी प्रवाशांना जावे लागणार नाही. हे काम नवीन मशिन करेल. परिणामी प्रवाशांच्या वेळेत बचत होईल.
३. फूड कोर्ट
४. प्रवाशांना आराम करण्यासाठी लाउंज यात एक कर्मशिअल लाउंजचा देखील समावेश असणार आहे.
५. कार्बन फूट प्रिंट कमी करण्यासाठी विमानतळावर स्काय लाइटचा वापर.
६. लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था.
७. रेस्टॉरंट.
नव्या टर्मिनल इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या एरोब्रिज जोडण्याचे काम झाले आहे. ऑगस्टपासून प्रवासी सुविधांची चाचणी सुरू होईल. सप्टेंबर मध्ये नवे टर्मिनल प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची आशा आहे.
- गगन मलिक, सरव्यवस्थापक, नवे टर्मिनल, पुणे विमानतळ