पुणे महापालिकेला तृतीय पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे महापालिकेला तृतीय पुरस्कार
पुणे महापालिकेला तृतीय पुरस्कार

पुणे महापालिकेला तृतीय पुरस्कार

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः कचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण, वृक्षारोपण अशा विविध घटकांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य सरकारकडून ‘माझी वसुंधरा अभियान ३.०’ याअंतर्गतचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पुणे महापालिकेला प्राप्त झाला आहे. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
राज्य सरकारच्यावतीने पर्यावरण जनजागृतीसाठी ‘माझी वसुंधरा अभियान ३.०’ हे अभियान राज्य पातळीवर राबविले आहे. या अभियानाचे यंदा तिसरे वर्ष आहे. त्यादृष्टीने सोमवारी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून यंदाच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मुंबई येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, उपायुक्त माधव जगताप, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, सल्लागार पूजा ढोले यावेळी उपस्थित होत्या.

या कामासाठी मिळाला पुरस्कार
‘माझी वसुंधरा’ या अभियानाअंतर्गत विविध घटकांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्य सरकारकडून पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जातो. ‘माझी वसुंधरा अभियान ३.०’ मध्ये भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या पंचमहाभूतांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीत केलेल्या कामाचे मूल्यमापन करण्यात आले होते. या स्पर्धेअंतर्गत ‘१० लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली अमृत शहरे’ या गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल पुणे महानगरपालिकेस तृतीय क्रमांक जाहीर करण्यात आला. दरम्यान, पिंपरी चिंचवड शहराने प्रथम क्रमांक तर नवी मुंबईने द्वितीय क्रमांक पटकाविला.