महापालिकेच्या शाळांमध्ये वाढला विद्यार्थ्यांचा ‘टक्का’ ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेच्या शाळांमध्ये वाढला विद्यार्थ्यांचा ‘टक्का’ !
महापालिकेच्या शाळांमध्ये वाढला विद्यार्थ्यांचा ‘टक्का’ !

महापालिकेच्या शाळांमध्ये वाढला विद्यार्थ्यांचा ‘टक्का’ !

sakal_logo
By

पांडुरंग सरोदे ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ६ ः ‘‘माझा मुलगा नावाजलेल्या खासगी शाळेत होता. परंतु तिथे त्याच्या अभ्यासात, कौशल्यात कुठलाच बदल होत नव्हता. मुलगा अभ्यासात रस घेत नव्हता. शेवटी आम्ही त्याला खासगी शाळेतून काढून महापालिकेच्या शाळेत टाकले. आता त्याच्यामध्ये चांगले बदल झालेत, तो स्वतः अभ्यास करतो, खेळात, वक्तृत्व, लेखन स्पर्धेत सहभाग घेत आहे’’, ही प्रतिक्रिया आहे, वैष्णवी या पालकाची ! अशा प्रकारे सध्या खासगी शाळांमधून महापालिकेच्या शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे. यंदा साडेचार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची वाढ महापालिकेच्या शाळांमध्ये झाली आहे.

आर्थिक दुर्बल घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी हक्काचे ठिकाण म्हणून महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पाहिले जाते. अनेक विद्यार्थी अशाच सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात उच्चपदावर गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र खासगी शिक्षण संस्थांच्या वाढीनंतर सरकारी शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. परिणामी, पालकांकडून महापालिकेच्या शाळांऐवजी कर्ज काढून खासगी शाळांमध्ये आपल्या पाल्यांना घालण्याचा प्रकार सुरु झाला. हे चित्र अद्यापही कायम असले तरीही कोरोनापासून त्यास काही प्रमाणात छेद मिळत असल्याची आहे.

कोरोनामुळे परिस्थिती ढासळली
कोरोनामुळे अनेक पालकांची नोकरी गेली, उद्योग, व्यवसाय बुडाले. त्यामध्ये अनेक पालकांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले. त्यामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये भरमसाट शुल्क भरून शिकविण्याऐवजी महापालिकेच्या शाळांमध्ये त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतले. अनेक डॉक्‍टर, अभियंते, व्यावसायिकांच्या मुलांनी महापालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. महापालिकेच्या शाळांचा वाढलेला शैक्षणिक दर्जा, गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना मिळणारा वाव अशा कारणांमुळेही पालक महापालिकेच्या शाळांकडे आकर्षित होऊ लागले असून पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थी संख्या वाढली आहे.

विविध उपक्रमांचे आकर्षण
- महापालिकेच्या शाळांमध्ये शाळापूर्व तयारी आणि पटनोंदणी अभियान राबविले जात आहे.
- शालाबाह्य विद्यार्थी शाळांमध्ये अधिकाधिक संख्येने कसे येतील, यासाठी महापालिका शाळांमध्ये शिक्षकांकडून प्रयत्न केले जात आहेत.
- वस्त्यांमध्ये घरोघरी जाऊन पालकांना मार्गदर्शन करण्यापासून डायरेक्‍ट बेनिफीट ट्रान्सफरद्वारे (बीबीटी) विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे भरून त्यांना गणवेश, वह्या, स्टेशनरीचा लाभ दिला जात आहे.

अशी आहेत कारणे
- खासगी शाळांचा मनमानी कारभार
- अनुभव नसलेल्या शिक्षकांकडून शिक्षण
- शाळांकडून आकारले जाणारे अवाजवी शुल्क
- शुल्क भरण्यास विलंब झाल्यानंतर विद्यार्थी/पालकांना वेठीस धरणे
- विद्यार्थी, पालकांना मिळणारी अपमानास्पद वागणूक
- खासगी शाळांमध्ये बाउंसर ठेऊन पालक, विद्यार्थ्यांना जरब बसविण्याचा प्रकार

माझा मुलगा पाचवीपर्यंत एका नामांकित खासगी शाळेत शिक्षण घेत होता. परंतु, तिथे मुलाच्या अभ्यासात, कौशल्यात कुठलाच फरक पडत नसल्याचे आम्हाला जाणवत होते. मुलाच्या अभ्यासक्रमाकडे गांभीर्याने पाहिले जात नव्हते. त्यामुळे आम्ही मुलाला महापालिकेच्या शाळेमध्ये घातले. आता मुलाची अभ्यासात प्रगती आहे, त्याचबरोबर तो खेळ, वक्तृत्व स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्येही सहभाग नोंदवू लागला आहे.
- सुवर्णा नष्टे-लिगाडे, पालक, कात्रज

खासगी शाळांमधून महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यास वेगवेगळी कारणे आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांकडूनही विविध प्रकारचे उपक्रम राबवून मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच यंदा महापालिकेच्या शाळेमध्ये साडेचार हजार विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.
- मीनाक्षी राऊत,
शिक्षणाधिकारी, पुणे महापालिका

गुरूजींनी ऐसे द्यावे धडे
आपला आदर्श ठेवूनी पुढे
विद्यार्थी घडे संपूर्णपणे
राष्ट्र होई तेजस्वी...
शिक्षकांमुळेच विद्यार्थी घडले जातात. त्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतात. अशाच प्रयत्नांमुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. याबाबत आपले मत मांडा....