पुणे स्थानकावर नवीन पादचारी पूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे स्थानकावर नवीन पादचारी पूल
पुणे स्थानकावर नवीन पादचारी पूल

पुणे स्थानकावर नवीन पादचारी पूल

sakal_logo
By

पुणे स्थानकावर नवा पादचारी पूल बांधणार
बारा मीटर रुंदीच्या पुलासाठी ११ कोटी रुपये खर्च
पुणे, ता. २ ः प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वे स्थानकावर १२ मीटर रुंदीचा पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. जुना झालेला पूल पाडून त्या जागी सुमारे ११ कोटी रुपये खर्चून तो बांधण्यात येईल.
पुणे रेल्वे विभागाने याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाला पाठविला आहे. नवा पूल फलाट क्रमांक १ ते फलाट क्रमांक ६ यांना जोडणारा असेल. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होईल. पुलाला जोडणाऱ्या प्रत्येक फलाटावर पाच लिफ्ट बसविण्यात येतील.
पुणे स्थानकावर सध्या एकूण चार पादचारी पूल आहेत. पैकी दोनच पूल सर्व सहा फलाटांना जोडतात. त्यामुळे फलाट क्रमांक पाच व सहा येथे जाण्यासाठी प्रवाशांना दमछाक होते. आता नवा पूल मोठा असेल. शिवाय तो सर्व फलाटांना जोडला जात असल्याने प्रवाशांची मोठी सोय होईल.
---

रॅम्पच्या जागी लिफ्ट
रॅम्प असलेला पादचारी पूल हा खूप जुना झाला आहे. त्याची स्थिती खराब असल्याने प्रवाशांसाठी तो बंद करावा लागला आहे. सध्या या पुलावरून केवळ दिव्यांग प्रवाशांना जाण्याची परवानगी आहे. हाच पूल पाडून नवा पूल बांधण्यात येईल. शिवाय रॅम्प काढून त्या जागी लिफ्ट बसविण्यात येणार असल्याने दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांची सोय होईल.
---

पुलाचे विस्तारीकरण
स्थानकावरील सोलापूरच्या दिशेने असलेल्या फलाट एक ते तीन यांना जोडणाऱ्या पादचारी पुलाचे विस्तारीकरण होईल. मे महिन्यात मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक धनंजय नाईक यांनी स्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी या पुलाच्या विस्तारीकरणाच्या सूचना दिल्या. आता वाणिज्य विभाग त्याचाही प्रस्ताव तयार करीत आहे.
---

स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढल्याने पादचारी पुलावर देखील गर्दी होत आहे. त्यामुळे १२ मीटर रुंदीचा पूल बांधणे आवश्यक आहे. पूल बांधताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
- इंदुराणी दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे
---
नवा पूल झाल्यास प्रवाशांना निश्चितच मोठा दिलासा मिळेल. वेळेत न पोचल्याने गाडी चुकण्याच्या तसेच पर्यायाने चेन ओढली जाण्याच्या प्रकारांना आळा बसू शकेल.
- आनंद सप्तर्षी, स्थानक सल्लागार समिती सदस्य, पुणे
-----