हिरव्यागार गोल्फ कोर्सवर फुलले निरागस हास्य

हिरव्यागार गोल्फ कोर्सवर फुलले निरागस हास्य

पुणे, ता. २७ : ‘हिरव्यागार गोल्फ कोर्सचं बाहेरून होणारं दर्शन सरावाचं होतं. हा खेळ खेळतात कसा, इतकी हिरवाई कशासाठी, अशा शंका मनात असायच्या. आज गोल्फ कोर्सवर प्रत्यक्ष पाऊल टाकता आलं. खेळ खेळता आला. मनातली इच्छा पूर्ण झाली. हा अनुभव खूपच छान होता...’ पुण्यातील ‘बालग्राम, एसओएस चिल्ड्रेन्स व्हिलेज’मधील मुले-मुली सांगत होती. त्यांनी नुकतीच ‘पूना गोल्फ कोर्स’ला भेट दिली अन् तेथे गोल्फचा आनंदही लुटला.
‘बालग्राम’मधील विद्यार्थी-विद्यार्थिनींना क्रिकेट, फुटबॉल, हॉकी अशा विविध खेळांची ओळख व्हावी आणि प्रशिक्षण मिळावे, यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या मुलांनी गोल्फ कोर्सला भेट दिली. तेथील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले. या वेळी गोल्फ कोर्सचे अध्यक्ष सुनील हांडा, उपाध्यक्ष गौरव घडोक, गोल्फ समन्वयक इंद्रनील मुजगुले, गोल्फ कॅप्टन इकराम खान, ‘एपी ग्लोबले’चे अध्यक्ष अभिजित पवार, ‘बालग्राम’च्या सहायक संचालिका मनीषा देसाई आणि मुलांना सांभाळणाऱ्या मदर्स उपस्थित होत्या.
गोल्फ क्लबला भेट द्यायला मिळणार हे समजल्यानंतर मुलांची उत्सुकता शिगेला पोचली होती. गोल्फ नेमका कसा खेळला जातो, याची माहिती त्यांना नव्हती. त्यामुळे तो प्रत्यक्ष खेळायला गेल्यानंतर गोल्फ स्टीक कशी पकडायची, फटका जोरात मारायचा का, किती फटक्यात बॉल पोहोचतो, स्पर्धा नेमकी कशी पार पडते, असे अनेक प्रश्‍न मुला-मुलींनी प्रशिक्षकांना विचारले. गोल्फ कोर्सचे कामकाज कसे चालते, इथंपासून प्रत्यक्ष गोल्फ खेळण्यापर्यंतच्या अनेक बाबी विद्यार्थ्यांनी या भेटीदरम्यान अनुभवल्या. स्वप्न पूर्ण झाल्याच्या आनंदामुळे चेहऱ्यावर फुललेले हास्य सोबतीला घेऊनच ही मुले पुन्हा ‘बालग्राम’मध्ये परतली.

विद्यार्थ्यांशी संवाद
गोल्फ कोर्सला जाण्यापूर्वी अभिजित पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना आवडत असलेले खेळ समजून घेतले. ‘आवडीचे खेळ आवर्जून खेळले पाहिजे. भरपूर मज्जा करा. मात्र त्याबरोबर अभ्यास देखील गरजेचा आहे. त्यामुळे खेळा, मज्जा करा अन् अभ्यासाकडे देखील लक्ष द्या,’ असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

काय आहे बालग्राम?
बालग्राम चिल्ड्रेन्स व्हिलेजेस, महाराष्ट्र या संस्थेच्या येरवडा शाखेत सध्या संरक्षण व काळजीची गरज असलेल्या ५ ते १८ वर्षांपर्यंतच्या ७२ मुलांची (मुले व मुली) निवास, शिक्षण, देखभाल व सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी संस्थेकडून घेतली जाते. मुलांना स्वावलंबी बनविण्यासाठी तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देऊन, व्यवसाय सुरु करण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य केले जाते.


बालग्राममधील मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवता आले, याचा आम्हाला आनंद आहे. त्यांच्यातील उत्साह या निमित्ताने जाणवला. त्यामुळे आता आम्ही नियमित त्यांना बोलावून प्रशिक्षण देणार आहोत. त्यातून भविष्यात कोणी गोल्फर होवू शकेल. आमचे प्रशिक्षक त्यांना प्रशिक्षण देतील.
- सुनील हांडा,
अध्यक्ष, पूना क्लब गोल्फ कोर्स

प्रत्येक मुलात कौशल्य असते हे ‘बालग्राम’मधील मुलांना गोल्फ शिकवत असताना लक्षात आले. मुलांमधील कौशल्य हेरून प्रोत्साहन देत त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. आम्ही लहान बॅच घेऊन ‘बालग्राम’मधील मुलांना पुन्हा बोलविणार आहे.
- इंद्रनील मुजगुले, गोल्फ समन्वयक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com