‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव! पुणे आवृत्तीचा ९१ वा वर्धापन दिन आनंददायी वातावरणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव! 
पुणे आवृत्तीचा ९१ वा वर्धापन दिन आनंददायी वातावरणात
‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव! पुणे आवृत्तीचा ९१ वा वर्धापन दिन आनंददायी वातावरणात

‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव! पुणे आवृत्तीचा ९१ वा वर्धापन दिन आनंददायी वातावरणात

sakal_logo
By

पुणे, ता. १ : कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच मोठ्या आनंदात अन्‌ उत्साहात एकत्र येत पुणेकरांनी रविवारी ९१ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘सकाळ’वर अक्षरश: शुभेच्छांचा वर्षाव केला. नववर्षाच्या जल्लोषमय स्वागतानंतर हजारो पुणेकरांची पावले वळली ती सर्वसामान्यांच्या मनात आपुलकीचे स्थान असणाऱ्या ‘सकाळ’च्या वर्धापनदिन सोहळ्याकडे. पुण्याचाच नव्हे तर महाराष्ट्राचा आरसा असलेल्या ‘सकाळ’ने आता ९२ व्या वर्षात पदार्पण केले. नव्या उमेदीने पुन्हा एकमेकांची गळाभेट घेत, ‘सकाळ’ला शुभेच्छा देत हा स्नेह वृद्धिंगत केला. कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनंतर मोठ्या संख्येने नागरिकांनी या सोहळ्यात उपस्थित राहून ‘सकाळ’वर असणारा स्नेह व्यक्त करत सोहळ्याचा आनंद द्विगुणित केला. नागरिकांच्या अलोट गर्दीने वर्धापन दिनाचा सोहळा रंगला.

नववर्षाची सुरुवात आनंददायी आणि प्रचंड सकारात्मक वातावरणात करण्यासाठी सर्वसामान्य वाचकांपासून वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांपर्यंत अनेकांनी वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी होऊन ‘सकाळ’ला भरभरून शुभेच्छा दिल्या अन् एकमेकांतील नाते अधिक वृद्धिंगत केले. नवीन वर्षाच्या पहिल्या सायंकाळी सुरू झालेला हा मंगलमय सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला अन्‌ वाचकांनी हजेरी लावत दाखविलेल्या आपुलकीत, प्रेमात हा सोहळा अक्षरश: न्हाऊन गेला. गेल्या नऊ दशकांहून अधिक काळापासून प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी एकरूप झालेल्या ‘सकाळ’चा वर्धापन दिन ‘सकाळ’च्या बुधवार पेठेतील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित केला होता.

नव्या-जुन्या पिढीतील आणि अगदी कोवळ्या वयातील बालवाचकही यानिमित्ताने एकत्र आले होते. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, साहित्य-संस्कृती, विज्ञान अशा विविध क्षेत्रांतील असंख्य नागरिकांनी ‘सकाळ’वर शुभेच्छांचा अखंड वर्षाव करत शुभेच्छा दिल्या. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, संपादक-संचालक श्रीराम पवार, संपादक सम्राट फडणीस, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, ‘साम टीव्ही’चे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांनी पुणेकरांची भेट घेत त्यांचे स्वागत केले.

या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, खासदार वंदना चव्हाण, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील कांबळे, आमदार चेतन तुपे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, पोलिस आयुक्त रितेशकुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
सर्वसामान्य नागरिकांपासून विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अलोट गर्दी करून ‘सकाळ’वर प्रेम-शुभेच्छा यांचा वर्षाव केला. वाचकांशी असणाऱ्या ऋणानुबंधाला उजाळा देण्याबरोबरच शुभेच्छांच्या वर्षावाने ‘सकाळ’ कार्यालयाचे अवघे प्रांगण भरून गेले. सर्वसामान्य वाचकांसह शिक्षण, सामाजिक, राजकीय, कला, प्रशासकीय अधिकारी, पोलिस अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी वर्धापन दिनाला उपस्थित राहून ‘सकाळ’समवेत असणारे आपले नाते अधिक घट्ट केले.

या सोहळ्यात दोन वर्षांतील काही कटू आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या, तर दुसरीकडे नागरिकांनी ‘‘आता ‘सकाळ’च्या साथीनं मनसोक्त जगायचं,’’ असा सल्ला देत भविष्यातील स्वप्ने उराशी बाळगत कॉफी, पेढ्याचा गोडवा जीभेवर ठेवत एकमेकांचा निरोप घेतला.

उत्तरोत्तर रंगला स्नेहमेळावा
सनईचे मंजूळ स्वर...‘एलईडी स्क्रिन’वरून ‘सकाळ’ची गेल्या नऊ दशकांची उलगडणारी वाटचाल...राजकीय व्यक्तींमध्ये रंगलेली महापालिका निवडणुकीची चर्चा, तर कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढणार का? अशा चर्चेत गुंतलेले सामान्य वाचक...काळानुसार ‘सकाळ’ने बदल कसा स्वीकारला, हे अनुभव सांगणाऱ्या जुन्या-नव्या मित्रांच्या रंगलेल्या मैफली एवढंच नव्हे तर एकमेकांना नववर्षाच्या दिल्या
जाणाऱ्या शुभेच्छा...तरुणाईकडून काढले जाणारे ‘सेल्फी’...तर ज्येष्ठांकडून आपुलकीने छायाचित्र काढण्यासाठी केली जाणारी विचारपूस अशा अनोख्या चैतन्यमय वातावरणात हा सोहळा रंगला. मोठ्या संख्येने आलेल्या महिलांचा असणारा लक्षणीय सहभाग, त्याचबरोबर ‘तनिष्का’च्या सदस्यांनी केक कापून व्यक्त केलेल्या भावना...अशा जल्लोषपूर्ण वातावरणात हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला.

(‘सकाळ’च्या वर्धापन दिनाची सविस्तर बातमी आणि उपस्थितांची नावे उद्याच्या अंकात)

फोटो ओळ :
सकाळ कार्यालय, पुणे : ‘सकाळ’च्या ९१ वा वर्धापन दिनानिमित्त रविवारी सर्वसामान्य नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन ‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘सकाळ’समवेत असणारे नाते अधिकाधिक दृढ करण्यासाठी वाचकांनी शुभेच्छा देत स्नेह व्यक्त केला. पुणेकरांच्या अलोट गर्दीने हा सोहळा रंगला.