आज उशिरा आली जाग उद्या संकल्पानुसार वाग! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज उशिरा आली जाग
उद्या संकल्पानुसार वाग!
आज उशिरा आली जाग उद्या संकल्पानुसार वाग!

आज उशिरा आली जाग उद्या संकल्पानुसार वाग!

sakal_logo
By

गेल्या आठवडाभरापासून आम्ही समाजमाध्यमावर नवीन वर्षांचे अनेक संकल्प ‘सोडले’ होते. संकल्प सोडण्याचे आमचे यंदाचे पंधरावे वर्ष आहे. हमखास शंभर टक्के अयशस्वी ठरणारा संकल्प म्हणजे रोज पहाटे उठून जिमला जाणे. त्यानंतर वडा-पाव-मिसळ-पाव असले तेलकट पदार्थ न खाणे. यंदा नेहमीप्रमाणे आम्ही संकल्प सोडले. मात्र, त्याची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी, यासाठी एक जानेवारीपासून डायरी लिहिण्याचाही नवीन संकल्प आम्ही जोडला. त्या डायरीतील काही पाने...

एक जानेवारी
गाढ झोपेत असताना पहाटे पाचला गजर चालू झाल्याने काय करावे, हे सुचलं नसल्याने ‘चोर चोर’ म्हणून जोरात ओरडलो. मात्र, वेळीच सावध झालो. बायकोनं ‘चोरांचं स्वप्न पडल्याने झोपेत चावळताय काय?’ असं विचारलं.’ मात्र, अंथरूणावरून लगेच उठत ‘अगं मी ‘जोर-जोर’ असे ओरडलो. पहाटे पाचला उठून ‘जोर मारायचे’ असा संकल्प आहे. ‘काय मेली एकेक थेरं’ असं म्हणून बायको पुन्हा झोपली. त्यानंतर आम्हीदेखील सलग सहा जोर मारल्याने थकलो. त्यानंतर डोळा कधी लागला, हेच कळलं नाही. जाग आली तेव्हा नऊ वाजले होते. ‘बाप रे! नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घड्याळ फारच फास्ट पळतंय’ असं पुटपुटून जिमला जाण्याची तयारी करू लागलो.
‘नाश्‍त्याला सामोसे केलेत.’ असं बायकोनं म्हटल्यावर आम्ही रागाने बघितले. ‘आजपासून आम्ही बेकरीचे पदार्थ व तेलकट-तुपकट काही खाणार नाही. ‘सॅलड दे’ असं म्हटले. तिने सॅलड दिले. त्यानंतर आम्ही जिमला गेलो. मात्र, जिमबाहेर एक किलोमीटरची रांग लागली होती. ‘एक जानेवारीपासून जिम जॉईन केलेल्यांची रांग आहे,’ असे उत्तर एकाने दिले. मग आम्हीही रांगेत उभे राहिलो. दोन तासाने आमचा नंबर आला.
‘नियमित व्यायाम करणाऱ्यांनी एक ते पाच जानेवारी दरम्यान जिमला येऊ नये कारण या काळात संकल्पवाल्यांची जिममध्ये मोठी गर्दी असते.’ या पाटीने आमचे लक्ष वेधले. आम्ही सगळी जिम फिरून पाहिली. एवढे सगळे होईपर्यंत बारा वाजले होते. आम्हाला कडाडून भूक लागली होती. शेजारच्या हातगाडीवरून येणाऱ्या वडा पावच्या वासामुळे आम्ही कासावीस झालो. ‘‘वडे जास्त तेलकट नाहीत ना?’’ आम्ही विक्रेत्याला विचारले. त्याने नकारार्थी मान डोलावली. भुकेमुळे आम्‍ही आणखी तीन वडापाव हाणले. त्यानंतर घरी आलो. पोट गच्च झाल्याने दुपारी कसंबसं दोन-तीन घास खाल्ले. ‘डायट आहे’ अशी थाप बायकोला मारली. दुपारचं झोपायचं नाही, असाही एक संकल्प होता. मात्र, पहिल्या दिवशी दहा मिनिटंच झोपू, असं ठरवून आडवा झालो. मात्र, जाग आली, त्यावेळी सहा वाजून गेले होते. आता मात्र कडाडून भूक लागली होती. किचनओट्यावर सकाळी तळलेले पाच-सहा सामोसे दिसले. आम्ही खाल्ले नाहीत तर ते वाया जातील, म्हणून गरम करून, सगळे खाऊन टाकले. किराणा घेऊन आलेल्या बायकोने ‘येथील सामोसे कोठे गेले?’ असे विचारल्यावर ‘बोक्याने खाल्ले’ असे उत्तर दिले. त्यानंतरही बायको आमच्याकडे संशयाने पाहत होती. ती आम्हालाच बोका समजली काय, असा संशय आम्हाला आला. रात्रीच्या जेवणानंतर मोबाईलला हात लावायचा नाही, असा एक संकल्प होता. मात्र, पाच मिनिटे पाहू, असे ठरवले. मात्र, मोबाईलवरील रील्स पाहून व चॅटिंग करून मध्यरात्रीचे दोन कधी वाजले, तेच समजले नाही. त्यानंतर पहाटे पाचला उठायचे असा संकल्प करून झोपी गेलो.

दोन जानेवारी
आज सकाळी दहाला जाग आली. त्यामुळे जिम कॅन्सल केली. बायकोने नाश्‍त्याऐवजी कारल्याचा ज्यूस दिल्याने शेजारच्या हॉटेलमध्ये जाऊन मिसळ-पाववर ताव मारला. उद्यापासून संकल्पानुसार वागायचं, असं ठरवून मोबाईलमध्ये गेल्या तीन तासांपासून डोकं घालून बसलो आहोत.