हस्तलिखित प्रॉपर्टी कार्ड आजपासून बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हस्तलिखित प्रॉपर्टी कार्ड आजपासून बंद
हस्तलिखित प्रॉपर्टी कार्ड आजपासून बंद

हस्तलिखित प्रॉपर्टी कार्ड आजपासून बंद

sakal_logo
By

पुणे,ता. १ : ऑनलाइन प्रॉपर्टी कार्डला राज्य सरकारकडून कायदेशीर मान्यता देण्यात आल्यामुळे सोमवार (ता.२) पासून प्रॉपर्टी कार्डची हस्तलिखित व फोटोकॉपी प्रमाणित नक्कलांचे वितरण पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ऑनलाइन प्रॉपर्टीकार्ड उपलब्ध होणार आहे. तसेच ते शासकीय अथवा निमशासकीय कामकाजासाठी ग्राह्य धरले जाणार आहे.

राज्यातील नगरभूमापन (सिटी सर्व्हे) झालेल्या भागात प्रॉपर्टी कार्ड व्यवस्थापनाकरीता ई प्रॉपर्टी कार्ड इन्फॉर्मेशन सिस्टीम (ई-पीसीआयएस) प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत प्रॉपर्टी कार्ड हे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देत आहेत. तसेच खरेदी, बक्षिसपत्र, हक्कसोड, वाटप, भाडेपट्टा, बोजा दाखल करणे अथवा बोजा कमी करणे आदींच्या नोंदणीकृत दस्ताच्या आधारे ऑनलाइन फेरफार घेण्यात येत आहे. डिजिटल स्वाक्षरीत अद्ययावत संगणकीकृत तयार होणारे प्रॉपर्टी कार्ड नागरिकांसाठी महाभूमि या संकेतस्थळावर उपलब्ध होत आहेत.
राज्य शासनाने महाभूमि संकेतस्थळावरून डिजिटल स्वाक्षरीत असलेले प्रॉपर्टी कार्ड, फेरफार, नमुना ९ ची नोटीस, नमुना १२ ची नोटीस या सर्व कायदेशीर व अशासकीय , निमशासकीय कामकाजासाठी वैद्य राहतील, असा निर्णय शासनाने घेतला आहे. अशा डिजिटल स्वाक्षरीत डेटाबेस आधारित ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड, फेरफार नोंदवहीचा उतारा तसेच ईपीसीआयएस या प्रणालीद्वारे तयार होणारे दस्तऐवज यावर परिक्षण भूमापक, भूकरमापक, मुख्यालय सहायक अथवा अन्य कोणत्याही अधिकाऱ्याची शाईने केलेली स्वाक्षरी असण्याची आवश्‍यकता नसल्याचे शासनाने म्हटले आहे. याबाबतचे शासन निर्णय महसुल व वन विभागाचे अवर सचिव भगवान सावंत यांनी जारी केला आहे.