
स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गासाठी ८१ लाख मंजूर
पुणे, ता. ७ : स्वारगेट ते कात्रज या बीआरटी मार्गावरील कामे करण्यासाठी महापालिकेने आणखी ८१ लाख रुपये मंजूर केले आहेत. ही रक्कम या बीआरटी मार्गावरील उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी उपयोगात आणली जाणार आहे. ८१ लाख रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली.
शहरात सध्या स्वारगेट ते कात्रज हा एकमेव बीआरटी मार्ग सुरु आहे. मात्र, या मार्गावरील रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यातच बीआरटी मार्गातील अनेक कामे अपूर्ण आहेत. ही कामे तत्काळ करणे गरजेचे असल्याने पालिकेच्या पथ विभागाने यासाठी निविदा प्रक्रिया राबवली. यासाठी अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद होती. तर पथ विभागाने ९९ लाख ८३ हजार रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार केले होते. या कामांमध्ये खोदकाम, सपाटीकरण, काँक्रिटीकरण, ड्रेनेज चेंबरची झाकणे समपातळीवर आणणे, बोलार्डस बसविणे, इंटरलॉकिंग ब्लॉक बसविणे यासह विविध प्रकारच्या कामांचा समावेश आहे. त्यासाठी सर्वात कमी दराने म्हणजे पूर्वगणनेपेक्षा २२ टक्के कमी म्हणजेच ६५ लाख रुपयांची निविदा सादर झाली. त्यावर जीएसटी व अन्य शुल्क अशा ८१ लाख २७ हजार रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली. सातारा रस्ता मुख्यतः काँक्रिटचा आहे. बीआरटी मार्गिका अंशतः डांबरी व काँक्रिट अशा मिश्र स्वरूपाची आहे. या निविदेद्वारे मुख्य सातारा रस्त्यावरील उर्वरित काँक्रिट रस्ते व बीआरटी मार्गिकेतील खराब झालेल्या रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. त्यामुळे बीआरटी मार्गातील बस वाहतुकीला गती प्राप्त होईल, असे पथ विभागाने स्पष्ट केले.