
एरंडवणे येथे अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण
एरंडवणे येथे अपुऱ्या पाणी
पुरवठ्यामुळे नागरिक हैराण
पुणे, ता. ७ : एरंडवणे भागात गेल्या काही दिवसांपासून अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळविले असता त्यांना याचा काहीच फरक पडत नसल्यामुळे येत्या ७२ तासात पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला आहे. यासंदर्भात आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांना प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी निवेदन दिले आहे.
नळस्टॉप, सहकार वसाहत, पंडित नेहरू वसाहत, दहा चाळ, गणेशनगर, एरंडवणे परिसरातील नागरिक कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता ‘एसएनडीटी’ टाकीची पातळी कमी राखली जात नसल्याने व एल ॲन्ड टी कंपनीने ६ इंचाची जलवाहिनी जोडणीचे काम पूर्ण न केल्याने पाणी कमी दाबाने व कमी वेळ येत असल्याचे सांगितले.
यासंदर्भात १५ दिवसांपूर्वी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांनी हा प्रश्न त्वरित सोडविण्याचे मान्य केले होते. पण मात्र अद्याप पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे येत्या ७२ तासात पुरवठा सुरळीत न झाल्यास हंडा मोर्चा काढण्याचा इशारा खर्डेकर यांनी दिला आहे.